कोसदनी घाट : मृतक आर्णी तालुक्यातील आर्णी : भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी ठार झाले. ही घटना आर्णी तालुक्यातील कोसदनी घाटात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. तर अपघातग्रस्त ट्रकवर तीन वाहने आदळल्याने तीन जण जखमी झाले. धरमसिंग विष्णू जाधव (३४), मंदा धरमसिंग जाधव (३०) रा. अंबोडा ता. आर्णी अशी मृत पती-पत्नीची नावे आहे. मजुरी करणारे हे दाम्पत्य आपल्या दुचाकीने बँकेच्या कामासाठी आर्णी येथे जात होते. कोसदनी घाटात समोरुन येणाऱ्या ट्रक क्र.एम.एच.२६-एच-६०४४ ने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात धरमसिंग जागीच ठार झाला. तर मंदा गंभीर जखमी झाली. तिला गंभीर अवस्थेत आर्णीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मोलमजुरी करणाऱ्या या दाम्पत्याच्या मागे अतीश (८) आणि सतीश (५) ही दोन मुले आहे. या अपघाताचे वृत्त अंबोडा येथे कळताच गावावर शोककळा पसरली. दरम्यान सायंकाळी ५ वाजता अपघातग्रस्त ट्रकवर ट्रॅव्हल्स, दुचाकी आणि एक ट्रक आदळला. त्यात दुचाकीस्वार तुकाराम सदाशिव बुरखे (२४) रा. चिखली ता. महागाव, ट्रॅव्हल्समधील प्रवासी राजेश प्रल्हाद वैद्य रा. पुलगाव आणि ट्रक चालक शबीर खान पठाण (५४) रा. नांदेड जखमी झाले. जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी सोनू राऊत, सुभाष पावडे यांच्यासह हायवे पोलीस केशव आदेवाड, रुपेश तिजारे, जावेद सय्यद, योगेश मेश्राम यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
ट्रकच्या धडकेत पती-पत्नी ठार
By admin | Updated: September 7, 2016 01:24 IST