कमी दाबाची वीज : सिंचनाची साधने ठरताहेत कुचकामीयवतमाळ : विहिरीवरून सिंचन करून पीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहे. कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने २३ हजार हेक्टरवरचे पीक करपण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने शॉक दिला आहे. कोरडवाहू शेतकरी पर्याय नसल्यामुळे गप्प आहे. मात्र ज्यांच्याकडे पाणी आणि सिंचनाची साधने आहेत, असाही शेतकरी आता हतबल झाला आहे. सातत्याने शेतकऱ्यांवर आघात होत आहे. यापूर्वी अतिवृष्टी आणि गारपिटीने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले. अशाही परिस्थितीतून बाहेर पडत मोठ्या उमेदीने खरिपाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. मात्र आता पाऊस नसल्याने बहरलेले पीक करपण्याच्या अवस्थेपर्यंत येऊन ठेपले आहे. जिल्ह्यात ९६ टक्के पेरणी झाली असून यामध्ये आठ लाख ६९ हजार ४२३ हेक्टरवर शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. चार लाख ४१ हजार ७४५ हेक्टरवर कापूस, दोन लाख ९७ हजार हेक्टरवर सोयाबीन, चार हजार २७७ हेक्टरवर भाजीपाला, २६ हजार ८३७ हेक्टरवर ज्वारी, दोन हजार ३०९ हेक्टरवर मका, ८९ हजार २५७ हेक्टरवर तुरीची पेरणी केली आहे. दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाऊसच आलेला नाही. मुळात सुरुवातीला अतिशय कमी पाऊस झाला. मात्र अशाही स्थितीत शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी आटोपली. काही ठिकाणी अल्पशा पावसावरच सोयाबीनचे पीक फुलावरसुद्धा आले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत ठिबक सिंचनाद्वारे कापसाची लागवड केली. या दुष्काळी स्थितीत ठिबक सिंचनातून पाण्याचे नियोजन करता येईल, अशा आशेने शेतकऱ्यांनी यात गुंतवणूक केली. शासनाच्या सबसिडीची वाट न पाहता कर्जाऊ रक्कम घेऊन शेतात ठिबक संच बसविला. आता मात्र पाणी असूनही ते पिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पूर्ण दाबाची वीज मिळत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक सिंचन निकामी ठरत आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेतून अनेक शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या आहे. त्यामुळे आता कृषी पंपांची संख्याही वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अत्याधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने जास्त अश्वशक्तीच्या मोटारी बसविल्या आहे. वीज कंपनीकडून कनेक्शन घेताना तीन एचपीच्या मोटारीसाठी घेतले. प्रत्यक्षात मात्र त्यावर पाच ते सात एचपीचा पंप चालविण्यात येतो. त्यामुळे विजेचा दाब पुरेशा प्रमाणात मिळत नाही. परिणामी मोटारपंप लाईन असूनही फिरत नाही. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी मोटारीवर आॅटोस्वीच बसविले आहे. भारनियमनानंतर लाईन येताच एकाच वेळी सर्व पंप सुरू होता. अचानक त्या ट्रान्सफार्मरवर दाब वाढतो. यामुळे अनेक पंप चालत नाही. भारनियमन नसले तरी शेतकऱ्यांना कमी दाबाची वीज मिळत असल्याने सिंचन करता येत नाही. वीज वितरण कंपनीने प्रत्यक्ष सर्वे करून ज्या ठिकाणी अतिरिक्त एचपीचे पंप बसविले, अशांवर कारवाई करावी शिवाय शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज मिळेल, असे ट्रान्सफार्मर उपलब्ध करून द्यावे तरच या दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना आपले पीक वाचविणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार तगादा लावल्यानंतरही वीज कंपनी कोणतीच कार्यवाही करीत नाही. त्यामुळे सिंचन सुविधा असलेलेही पीक धोक्यात आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
२३ हजार हेक्टरातील पिकाला शॉक
By admin | Updated: August 16, 2014 23:42 IST