नगर परिषद : अविनाश अग्रवाल, नितीन भुतडा स्वीकृत सदस्य उमरखेड : येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे अरविंद गादेवार विजयी झाले. त्यांनी एमआयएमच्या शेख जलील यांचा तीन मतांनी पराभव केला. या निवडणुकीत भोयर यांना १४ तर शेख जलील यांना ११ मते मिळाली. स्वीकृत सदस्यपदी अविनाश अग्रवाल आणि नितीन भुतडा यांची अविरोध निवड करण्यात आली. उमरखेड नगरपालिकेत भाजपा, शिवसेना, अपक्ष व राष्ट्रवादी अशा १४ नगरसेवकांचा गट स्थापन झाला. त्यात उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेत चुरस लागली होती. गजेंद्र ठाकरे व संदीप ठाकरे या दोघात चांगलीच चुरस दिसत होती. यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची दमछाक झाली. ऐनवेळी शिवसेनेकडून अरविंद भोयर यांचे नाव पुढे आले. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यांच्याविरोधात एमआयएमचे शेख जलील यांनीही अर्ज दाखल केला. या दोघात लढत होऊन भोयर यांचा विजय झाला. स्वीकृत सदस्यांसाठी एमआयएम कडून अविनाश अग्रवाल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड झाली तर भाजपाकडून नितीन भुतडा यांची निवड करण्यात आली. शिवसेनेकडून राजेश खामनेरकर यांचे नाव शिवसेना गटनेते संदीप ठाकरे यांनी सुचविले. परंतु शिवसेनेच्या तीन सदस्यांनी खामनेरकर यांच्या नावावर आक्षेप घेतला. याबाबत लेखीपत्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी पिठासीन अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे शिवसेनेच्या स्वीकृत सदस्यांची निवड स्थगित करण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी प्रवीण मानकर यांनी काम पाहिले. विजयानंतर अरविंद गादेवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. (शहर प्रतिनिधी)
उमरखेडच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अरविंद भोयर
By admin | Updated: January 6, 2017 02:04 IST