यवतमाळ : एकाच आमदारावर यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेने बाजी मारली आहे. संजय राठोड यांना अखेर या युती सरकारमध्ये ग्रामीण विकास राज्यमंत्रीपद मिळाले. वास्तविक ज्येष्ठ असल्याने त्यांची कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र भविष्यात त्यांना बढती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्याने राज्यात आता भाजपा-सेना महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सेनेच्या दहा आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस-दारव्हा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांना संधी दिली गेली. राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. सन २००४ मध्ये संजय राठोड जुन्या दारव्हा मतदारसंघातून काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यांनी आपली ही विजयी घोडदौड सन २००९ आणि आता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवली. या निवडणुकीत तर त्यांनी विदर्भातून पहिल्या व महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळवित आमदारकीची हॅट्ट्रिक साधली आहे. संजय राठोड गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे आमदार असले तरी या काळात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे सलग दोन वेळा निवडून येऊनही त्यांना विरोधी बाकावरच बसावे लागले होते. मात्र गेली १० वर्ष त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून यवतमाळात आणि विरोधी आमदार म्हणून विधानसभेत गाजविले. शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर त्यांनी गेल्या दहा वर्षात अनेक आक्रमक आंदोलने केली. या आंदोलनांच्या माध्यमातून सरकारला सळो की पळो करून सोडले होते. आता मात्र सत्तेत सहभागी झाल्याने त्यांची ही आंदोलनाची परंपरा किमान पाच वर्ष तरी खंडित होणार आहे. कारण ते स्वत: राज्यमंत्री असल्याने त्यांना थेट जनतेच्या दरबारातून येऊन सरकारविरोधात भूमिका घेता येणार नाही. मात्र राज्यमंत्रीपद मिळाल्याने आमदार संजय राठोड यांच्याकडून दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघातील नागरिकच नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहे. जनतेच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक राहणारे संजय राठोड हे अपेक्षापूर्ती करतील, असा विश्वास मतदारांना आहे. शेती, शेतकरी आणि ग्रामीण समस्यांची असलेली जाण पाहूनच ना.राठोड यांच्याकडे ग्रामीण विकास खात्याची जबाबदारी दिली गेल्याचे मानले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)
एकाच आमदारावर शिवसेनेने मारली बाजी
By admin | Updated: December 6, 2014 02:00 IST