सैयद फिरोज सदस्य : दुसऱ्या ‘स्वीकृत’ची घोषणा पुढील सभेत घाटंजी : गुरुवारी झालेल्या नगरपरिषदेच्या पहिल्या सभेत उपाध्यक्षपदी घाटी-घाटंजी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष शैलेश ठाकूर यांची बहुमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शैलेश ठाकूर यांच्या बाजूने १८ पैकी ११ सदस्यांची मते पडली. त्यांचे प्रतिस्पर्धी मनसेचे गजानन भालेकर यांना केवळ सात मतांवर समाधान मानून पराभव पत्करावा लागला. नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष नयना ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त वैध शिफारशीनुसार केली. त्यात शहर विकास आघाडीचे उपाध्यक्ष सैयद फिरोज यांची नियुक्ती करण्यात आली. नामनिर्देशित सदस्य पदाचे दुसरे उमेदवार अकबर युसुफ तंवर यांच्या नावासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना व मनसे यांनी एकत्र येवून आघाडी केली होती. या आघाडीला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यताही दिली होती. परंतु सभेत पिठासीन अधिकाऱ्यांनी नगर विकास विभागाच्या शासन निर्णयाचा हवाला देत मान्यता प्राप्त पक्षाचे किंवा गटाच्या तौलनिक संख्याबळाच्या प्रमाणात संबंधित पक्ष किंवा गट नामनिर्देशन करेल अशी तरतूद असल्याचे सांगितले. शासन परिपत्रकातील बाबींचे तंतोतंत पालन करून योग्य निर्णय घेता यावा, यासाठी सदर गटातील नामनिर्देशन जाहीर न करता पुढील सभेत अंतिम निर्णयासाठी ठेवण्याचा आदेश दिला. यामुळे सभेत एकच कल्लोळ उडाला. सभेत पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. (तालुका प्रतिनिधी)
घाटंजी उपनगराध्यक्षपदी शैलेश ठाकूर
By admin | Updated: January 6, 2017 01:57 IST