यवतमाळ : येथील बसस्थानकावर बेवारस स्थितीत आढळलेली शहीद जवानाची पेटी (ट्रंक) वडगाव रोड पोलिसांनी बुधवारी त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केली. सोमवारी सकाळी एसटीच्या सुरक्षा रक्षकांना ट्रंक आणि चार बॅगा बेवारस स्थितीत आढळल्या होत्या. या सर्व वस्तू वडगाव रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या होत्या. विकास कुडमेथे असे नाव आणि सैनिक क्रमांक असलेली लोखंडी पेटी (ट्रंक) व चार कापडी बॅग सुरक्षा रक्षकांना सोमवारी रात्री बेवारस स्थितीत आढळल्या. कुणाच्या तरी या वस्तू असेल असे समजून त्यांनी रात्रभर त्यावर लक्ष ठेवले. मात्र पहाट झाल्यानंतरही या वस्तू कुणीही नेल्या नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी याविषयीची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांना दिली. प्राथमिक तपासणी करून या सर्व वस्तू वडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या. दरम्यान, बेवारस आढळलेली ट्रंक उरी येथे आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पुरड (ता.वणी) येथील जवान विकास कुडमेथे यांची असल्याचे पुढे आले. बुधवारी त्यांच्या कुटुंबातील लोकांनी वडगाव रोड पोलीस ठाणे गाठले. वडगाव रोड पोलिसांनी ट्रंक त्यांच्या स्वाधीन केली. मात्र ही ट्रंक यवतमाळात कशी पोहोचली, इतर चार बॅग कुणाच्या, याचा तपास अजूनही लागलेला नाही. सध्या या वस्तू वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहेत. (वार्ताहर)
शहिदाची बेवारस आढळलेली ट्रंक कुटुंबीयांच्या स्वाधीन
By admin | Updated: January 19, 2017 01:02 IST