जीवघेणी कसरत : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष प्रकाश लामणे पुसद अत्यंत वर्दळीच्या पुसद-वाशिम राज्य मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून रस्त्यावर आता खड्डे पडायलाही जागा नाही. रस्त्याच्या झालेल्या चाळणीने वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत रस्ता पूर्णत: उखडला असून वाशिम जिल्ह्याची सीमा लागताच रस्ता गुळगुळीत दिसतो.पुसद सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पुसद ते वाशिम रस्ता येतो. गत उन्हाळ्यापासून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अडगाव ते मारवाडी या दोन किलोमीटरच्या रस्त्याची तर अक्षरश: चाळणी झाली आहे. डांबर पूर्णत: उखडून गेले असून या रस्त्यावरून वाहनधारकांना चालताना मोठी कसरत करावी लागते. पुसद परिसरातून वाशिम जाण्यासाठी अगदीजवळचा मार्ग म्हणून हा मार्ग ओळखला जातो. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. खंडाळा घाटातील रस्त्याचीही अशीच अवस्था झाली आहे. रस्त्याची कडा ठिकठिकाणी खचली आहे. मोठा पाऊस झाल्यास या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते. पावसात अनेकदा दरड कोसळून दगड वाहनावर कोसळतात. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून झालेच नाही. अरुंद घाटातून वाहन काढणे कठीण झाले असून या घाटाचे रुंदीकरण करण्याची गरज आहे. परंतु अद्यापही कुणी याकडे लक्ष दिले नाही. खंडाळा घाटासारखीच अवस्था मारवाडी घाटाची आहे. शिव मंदिर परिसरात रस्ता पूर्णत: उखडला आहे. या रस्त्यावरून दुचाकी वाहन चालविताना वाहनधारक त्रस्त होऊन जातो. रस्त्यावरून चालण्यापेक्षा रस्त्याच्या बाजूने जाणेच वाहनधारक पसंत करतात. हा सर्व प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाला माहीत असला तरी त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. यामुळे अपघाताची भीती वाढली असून वाहनधारक मात्र नाईलाजाने या मार्गावरून प्रवास करतात.
पुसद-वाशिम मार्गाची चाळणी
By admin | Updated: September 29, 2016 01:21 IST