माहूर : जिवंत विद्युत तारांची एकमेकांना घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांनी दुकानांना अचानक आग लागली. पाहता-पाहता या आगीने तब्बल सात दुकाने आपल्या कचाट्यात घेतली. त्यामध्ये चार दुकाने पूर्णत: जळून खाक तर तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा आकडा हा २५ लाखांपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भीषण आगीची ही घटना गुरूवारी रात्री ८.४५ वाजता माहूर येथे रेणुका मातेच्या शिखरावरील मंदिरात जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांच्या शेजारी घडली. माहूर गडावरील रेणुकेच्या मंदिर परिसरात आणि पायऱ्यांना लागून सुमारे ११० पेक्षा अधीक दुकाने आहेत. प्रसाद, खेळण्याचे साहित्य, पूजेचे साहित्य, आयुर्वेदिक औषधी फोटो आदींची ही दुकाने आहेत. याशिवाय खाद्यपदार्थाची दुकानेही मोठ्या प्रमाणात आहेत. माहूर शहरात गेल्या काही दिवसांपासून पोल शिफ्टींगचे काम सुरू आहे. सकाळपासून विद्युत प्रवाह अनेकदा खंडीत झाला. दरम्यान रेणुकेच्या मंदिरात जाणाऱ्या उजव्या पायऱ्यावरील दुकानावरून खांब टाकूण विद्युत जोडणी देण्यात आली आहे. हे खांब दुकानांच्या मधोमध आणि तारा वरून गेल्या आहेत. दरम्यान गुरूवारी रात्री ८.४५ वाजता अचानक या तारांमध्ये घर्षण झाले. त्यातून मोठ्या प्रमाणात ठिणग्या पडल्याने आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामध्ये शंकर मुडाणकर, संजय दराडे, जय आराध्ये यांच्या तीन दुकानांना लागलेली आग सात दुकानांपर्यंत जाऊन पोहोचली. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आटोक्यात येत नव्हती. अखेर गावकरी आग पाहून गडावर धडकले. त्यांनी मिळेल त्या ठिकाणाहून पाणी गोळा करून त्याचा मारा आगीवर केल्याने ती नियंत्रित करण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत प्राणहाणी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. आशीषकुमार बिरादार, नगराध्यक्ष गौतमी कांबळे, प्रा. राजेंद्र केशवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जाधव, जगदिश गिरी, व्यापारीसंघटनेचे अध्यक्ष मनोज घोगरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच आग आटोक्यात आणण्यात मदतही केली. (वार्ताहर)
माहूर येथे सात दुकानांना भीषण आग
By admin | Updated: November 15, 2014 02:10 IST