लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तालुक्यातील अकोला बाजार ते बारड तांडा रोडवर असलेल्या शेतातील गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सकाळी धाड टाकून सव्वा लाखांची देशी दारू जप्त केली. बारड तांडा रोडवर गोदामातून दारूची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून सापळा रचून दोन पोलिसांना साध्या वेषात ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. त्यानंतर धाड टाकण्यात आली. शुभम प्रवीण जयस्वाल (२५) रा. केशव पार्क, यवतमाळ व अंकुश मधुकर जाधव (३२) रा. बारड तांडा या दोघांना पोलिसांनी अटक केली. शुभम जयस्वाल याचेच हे शेत असून तो दारूची विक्री करीत होता, तर अंकुश जाधव हा दिवाणजी म्हणून काम पाहत होता. पोलिसांनी १ लाख १९ हजार ८०८ रुपयांचे ४८ देशी दारुचे बॉक्स जप्त केले. त्यामध्ये २३०४ देशी दारूच्या १८० मीलीच्या बाटल्या होत्या. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात एपीआय प्रशांत गीते, पीएसआय संतोष मनवर, जमादार संजय दुबे, गजानन धात्रक, अमोल चौधरी, किरण पडघण, विनोद राठोड, बंडू मेश्राम, आशिष गुल्हाने, आकाश सहारे, जयंत शेंडे, राजू कांबळे, वडगाव जंगलचे एपीआय दिलीप मसराम, ससाने आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वी पार पाडली.
शेतातील गोदामातून सव्वा लाखांची देशी दारू जप्त
By admin | Updated: June 19, 2017 00:44 IST