ग्रामसचिव निलंबित : योजना राबविण्यात दिरंगाईचा ठपकाराळेगाव : योजना राबविण्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत झरगडच्या विद्यमान आणि माजी ग्राम सचिवांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने २२ आदिवासी बांधवांनी सुरू केलेल्या उपोषणाची सांगता झाली. सन २००२ च्या दारिद्र्यरेषेखालील आदिवासी लाभार्थ्यांच्या घरकुलाची चौकशी व्हावी, झरगड गटग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी कारवाई व्हावी, १९९७-९८ मध्ये देण्यात आलेल्या आदिवासी घरकूलप्रकरण सखोल तपासण्यात यावे, ग्रामसभा न घेता मंजूर झालेल्या ठरावाची चौकशी करावी या प्रमुख मागण्यांना घेऊन झरगड येथील ग्रामस्थांनी येथे बेमुदत उपोषण सुय केले होते. देवेंद्र आत्राम यांच्या नेतृत्वात नानीबाई कुडमथे, नंदा मेश्राम, सरस्वती मेश्राम, देवकाबाई आत्राम, नामदेव आत्राम, सुरेश पंधरे, सतीश सिडाम, श्रावण पंधरे, गणेश परचाके, चरण पंधरे, सुखदेव आत्राम, वामन सिडाम, समीर मेश्राम, अजाब आत्राम, सिंधू पुसनाके, संभा पंधरे, महादेव पुसनाके, भारत मेश्राम, सित्रू पंधरे आदींनी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले होते. शनिवारी उपोषणाच्या पाचव्या दिवशी आमदार डॉ.अशोक उईके, अॅड.प्रफुल्ल चौहान, गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर चर्चा करून चौकशी केली. यात योजना राबविताना दिरंगाई झाल्याचे लक्षात आले. यावरून झरगडचे विद्यमान आणि माजी ग्रामसचिव आर.एम. ठावरी आणि ए.व्ही. कावलकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शिवाय पुढील योजना राबविताना गरजूंनाच लाभ दिला जाईल, असे आश्वासन दिल्याने उपोषण सोडविण्यात आले. यावेळी प्रभाकर पाटील, नागेश्वर हिवरे, बाळासाहेब दिगडे, भाजपा तालुकाध्यक्ष अनिल जवादे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आदिवासींच्या उपोषणाची सांगता
By admin | Updated: November 15, 2014 22:54 IST