पुसद : शेतकरी महिलेस मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुसद तालुक्यातील कुंभारी येथील एका आरोपीला येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी शरद देशपांडे यांनी सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. विनोद प्रल्हाद चव्हाण रा. कुंभारी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. खंडाळा पोलीस ठाण्यांतर्गत कुंभारी येथील लिलाबाई विष्णू चव्हाण यांच्या शेतात प्रल्हादची जनावरे शिरली होती. या जनावरांनी पिकांचे नुकसान केले. हा प्रकार सांगण्यासाठी लीलाबाई ८ जानेवारी २०१० रोजी विनोदकडे गेली. मात्र विनोदने तिचे काहीही एक न ऐकता डोक्यावर दगड मारला तसेच विळख्याने कंबरेवर हल्ला केला. लिलाबाईने दिलेल्या तक्रारीवरून खंडाळा पोलिसांनी आरोपी विनोद चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी उद्धव राठोड यांनी तपासाअंती दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला सुनावणीस आला. न्यायालयाने साक्षी पुरावे तपासल्यानंतर गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे न्या. देशपांडे यांनी आरोपी विनोद चव्हाण याला सहा महिन्याची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला. सरकारी वकील म्हणून अॅड. राजेश जयस्वाल यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)
महिलेस मारहाण करणाऱ्यास कारावासाची शिक्षा
By admin | Updated: March 16, 2015 01:57 IST