नववर्षाचा हळवा उपक्रम : गोरगरिबांसाठी चापमनवाडी परिसरातील साई मंदिरात एकवटणार समाज, एक जानेवारीला उद्घाटन यवतमाळ : जुने वर्ष संपून नवे वर्ष सुरू होत आहे. याच ‘संधीकाला’चा कॅनव्हास वापरून गरिबी-श्रीमंतीचाही सांधा जुळविण्याचा प्रयोग यवतमाळात होऊ घातला आहे. श्रीमंतांनी गरिबांसाठी स्वेच्छेने वस्तू द्याव्या आणि गरिबांनी त्यांना मोकळ्या अंत:करणाने स्वीकाराव्या यासाठी ‘माणुसकीची भिंत’ रंगविण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या सकाळी १ जानेवारीला या उपक्रमाचे रितसर उद्घाटन होणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, यवतमाळातील काही संवेदनशील महिलांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. चापमनवाडी परिसरातील शिंदे नगरातील प्रसिद्ध साई मंदिरात ही ‘माणुसकीची भिंत’ निर्माण करण्यात आली आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील भिंतीला आकर्षक पद्धतीने रंगविण्यात आले आहे. त्यावर कपडे, वस्तू ठेवण्यासाठी लोखंडी रॅक आणि तारा लावण्यात आल्या. समाजातील श्रीमंतांनी किंवा मध्यमवर्गीयांनीही आपल्याकडील जुन्या (किंवा नव्या) वस्तू येथे आणून ठेवाव्या. गरिबांनी त्या वस्तू वापरण्यासाठी घेऊन जाव्या, असा हा उपक्रम आहे. मोहिनी सचिन त्रिवेदी, दीपाली अग्रवाल, माधुरी पुराणिक, आरती बुरडकर, मालती पटेल, अश्रफ गिलाणी, कविता भोसले, पूजा रायचुरा या ग्रूपने हा उपक्रम सुरू केला आहे. नववर्ष दिनी रितसर उद्घाटन होणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना मोहिनी त्रिवेदी म्हणाल्या, आम्ही सर्व जणी एका व्हॉट्सअप ग्रूपमध्ये आहोत. त्यावरच आम्हाला अकोला, नागपूर येथील ‘माणुसकीच्या भिंती’बाबत कळले. मग आपण हा उपक्रम का राबवू नये, असा विचार केला. आम्ही प्रथम आमच्या व्हॉट्सग्रूपचे नाव बदलून ‘वॉल आॅफ ह्यूमॅनिटी’ असे केले. नंतर सर्व विचार करून साई मंदिरात अशीच भिंत निर्माण करण्याचा निर्णय घेतला. भिंतीसाठी मंदिरच निवडले कारण मंदिरात गरजू माणसेच येत असतात. शिवाय येथे दानधर्म करणारेही येत असतात. आम्ही हा उपक्रम राबविणार असल्याचे कळताच पंकज कुंद्रे आणि पराग हेडाऊ या शिक्षकांनी स्वत: भिंत रंगवून दिली. तर वेल्डिंग वर्क व्यावसायिक नंदूरकर यांनी मोफत रॅक करून दिली. मंदिराच्या ट्रस्टी मजीठिया यांच्याकडूनही उपक्रमासाठी परवानगी मिळाली. हा उपक्रम यशस्वी झाल्यास महादेव मंदिर व अन्य ठिकाणीही माणुसकीची भिंत उभारू, असे त्रिवेदी म्हणाल्या. (स्थानिक प्रतिनिधी)
संवेदनशील महिलांनी उभारली ‘माणुसकीची भिंत’
By admin | Updated: December 31, 2016 01:07 IST