लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुरुवातीला गर्भश्रीमंतांनाच बाधित करणारा कोरोना आता गोरगरिबांच्या घरात शिरला आहे. सुरुवातीला मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महापालिका क्षेत्रात फैलावलेला कोरोना यावेळी मात्र गावखेड्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद, पांढरकवडा सारखी शहरे सर्वाधिक बाधित झाली होती. मात्र सध्याच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने खेड्यातील गोरगरिबांची घरी गाठली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही रुग्ण शोधताना, कोविड सेंटरपर्यंत आणताना नाकीनऊ येत आहेत. फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यात रुग्ण वाढीला वेग आला. अजूनही ग्रामीण भागाच्या तुलनेत यवतमाळ आणि पुसद शहरात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मात्र मागील वर्षीचा विचार करता इतरही चौदा तालुके विशेषत: तालुक्यांमधील अत्यल्प लोकसंख्येच्या खेड्यांमध्ये रुग्ण वाढले आहेत. केवळ खेड्यापाड्यांमध्ये सहा हजार रुग्ण आढळले. त्यात २०० रुग्णांचा मृत्यू झाला. पांढरकवडा तालुक्यातील वांजरी या छोट्याशा खेड्यात १०० पेक्षा अधिक कोरोना संक्रमित आढळल्याने यंत्रणेची झोप उडाली. वांजरीसारखी अनेक खेडी कोरोनाच्या कचाट्यात सापडली आहे. विरळ लोकवस्ती, अंगमेहनतीची कामे, प्रतिकारशक्ती अशा जमेच्या बाजू असूनही खेड्यांत कोरोना पसरत आहे.
तापाचे रुग्ण घरात दडून गंभीर म्हणजे पूर्वीपेक्षा कोरोनाची दुसरी लाट जास्त तीव्र होऊन आली आहे. मागील वर्षी कोरोना अस्तित्वातच नाही, असा अनेक ग्रामीण माणसे दावा करीत होती. मात्र यंदा खेड्यातीलच संक्रमन पाहून तेही गर्भगळीत झाले आहेत. घाटंजी, आर्णी, दिग्रस, महागाव, वणी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यांमध्ये सध्या तापाची साथ सुरू झाली आहे. मात्र कोरोनाच्या धास्तीने अनेक जण घरच्या घरीच उपचार करून घेत आहेत. कोरोना चाचणीबाबत अजूनही अनेकांच्या मनात गैरसमज कायम असल्याने हे साध्या तापाचेही रुग्ण घरात दडून बसले आहेत.