सहा गट : १२ गणांसाठी २१ ला मतदान, प्रचारात ताकद पणाला लागली यवतमाळ : जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीच्या १२ गणांसाठी दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या टप्प्यात ९९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मारेगाव तालुक्यातील कुंभा-मार्डी, वणी तालुक्यातील घोन्सा-कायर, आर्णी तालुक्यातील देऊरवाडी-सुकळी, नेर तालुक्यातील वटफळी-अडगाव, दारव्हा तालुक्यातील लाडखेड-वडगाव आणि उमरखेड तालुक्यातील विडूळ-चातारी या सहा गटांची व या गटाअंतर्गत येणाऱ्या १२ पंचायत समिती गणांची निवडणूक होत आहे. आरक्षण बदलामुळे तेथील निवडणूक लांबणीवर पडली होती. यापैकी कुंभा-मार्डी, वटफळी-अडगाव आणि लाडखेड-वडगाव हे तीन गट सामान्य महिलांसाठी आरक्षित आहे. उर्वरित तीन गट खुले आहेत. या खुल्या गटांत प्रतिस्पर्धी उमेदवारांची विजयासाठी चांगलीच लढत रंगणार आहे. या सहा जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहे. पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ६५ उमेदवार कायम आहेत. १९ फेब्रुवारीला तेथील जाहीर प्रचार संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मतदानासाठी १७९ केंद्र राहणार आहे. एक लाख ४७ हजार सहा नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात ७७ हजार ३९६ पुरूष, तर ६९ हजार ६०९ महिलांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर या गट व गणांतील निवडणुकीत प्रचंड चुरस वाढली आहे. बहुमतासाठी या गट व गणांतील उमेदवारांना विजयी करण्यासाठी त्यांचे पक्ष व उमेदवार आपली सर्व ताकद पणाला लावत आहे. (शहर प्रतिनिधी)
दुसऱ्या टप्प्यात ९९ उमेदवार रिंगणात
By admin | Updated: February 18, 2017 00:24 IST