नगरपरिषद : जनसंपर्क व कागदोपत्री परिपूर्णता हवीयवतमाळ : ऐन दिवाळीतच नगरपरिषद निवडणुकांची आतषबाजी सुरू झाली आहे. अपेक्षेपेक्षा आठ दिवस अगोदर आलेल्या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय पक्षांपुढे उमेदवारीचा गुंता निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी दावेदारांची मोठी गर्दी आहे. तर कुठे उमेदवार शोधताना पक्षाच्या नाकीनऊ येत आहे. रात्रीचा दिवस करून कागदोपत्री आणि समीकरणात बसेल असा ‘परफेक्ट’ उमेदवार शोधला जात आहे. नगरपरिषदांतील अनेक भागात पक्षांना उमेदवार मिळणे कठीण ठरते. विशेष करून आरक्षणाच्या ठिकाणी काही बोटावर मोजता येईल इतक्याच दावेदारांपुढे पक्षाच्या तिकिटाचे प्रस्ताव पाठविले जातात. तर अनेक ठिकाणी पक्षांना दावेदारांच्या गर्दीचा सामना करावा लागतो. यातून एकाची निवड केल्यानंतर इतरांची नाराजीही मतदानावर परिणामकारक ठरणारी असू शकते. हा गुंता सोडविण्यासाठी राजकीय पक्षांना केवळ चार दिवस उरले आहेत. अशा स्थितीत लोकप्रियतेसोबतच आरक्षणातील उमेदवाराकडे जातवैधता प्रमाणपत्र आणि तत्सम कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या निकषात बसणारा उमेदवार शोधणे अवघड ठरत आहे. खुल्या जागेसाठी दावेदारांची भरमार आहे. मात्र, आरक्षणाच्या जागा देताना कस लागणार आहे. नगरपरिषदेत सर्वच पक्षांकडून स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. उमेदवार शोधण्याची शेवटची घटका जवळ आली असतानाही कोणत्याच पक्षाकडून आघाडी अथवा युतीची चर्चा केली जात नाही. त्यामुळे प्रत्येक जण स्वतंत्ररीत्या आपला उमेदवार उभा करण्यासाठी धडपडत आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांमध्ये स्थिती सारखीच आहे. पक्षश्रेष्ठीच्या स्तरावर ऐनवेळी आघाडी- युतीचा निर्णय झाला तरच समीकरणात उलटफेर होणार आहे. जिल्ह्यात यवतमाळ, घाटंजी, आर्णी, वणी, पुसद, दिग्रस, उमरखेड, दारव्हा या आठ नगरपालिकांत निवडणुकीचा फड रंगणार आहे. सध्या तालमीत तयार झालेल्या उमेदवारांना मोठा भाव मिळत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
पक्षांना ‘परफेक्ट’ उमेदवारांचा शोध
By admin | Updated: October 19, 2016 00:13 IST