उमरखेड : यावर्षी पैनगंगा नदी लवकरच कोरडी पडल्याने या नदीकाठावरील ५० ते ६० गावांमधील नागरिकांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. दरवर्षी ही समस्या या परिसरात भेडसावत असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. यावर्षी पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्यानंतरही पैनगंगा नदी लवकरच कोरडी पडली. या नदीच्या काठावर ५० ते ६० गावे आहेत. या गावांसाठी पैनगंगा ही जीवनदायिनी आहे. या परिसरातील शेतीसुद्धा नदी पाण्यावर अवलंबून आहे. यावर्षी लवकरच नदी कोरडी पडल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. आता एप्रिल, मे महिन्याला वेळ असतानाही फेब्रुवारीपासूनच या गावांमध्ये पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात ती अधिकच तीव्रपणे जाणवत आहे. त्यामुळे पुढील एप्रिल, मे महिन्यात परिस्थिती अधिकच विदारक होणार आहे. ५० ते ६० गावांतील हजारो नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. आतापासूनच एप्रिल, मे महिन्याचे नियोजन न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जावू शकते. संबंधित यंत्रणेने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)
उमरखेडच्या ५० गावांत टंचाई
By admin | Updated: March 8, 2017 00:19 IST