१८ हजार गट : जिल्हा बँकेने वाटप थांबविलेरूपेश उत्तरवार - यवतमाळ स्वयंरोजगारासाठी दिलेले कर्ज बहुतांश बचत गटांनी शेतीसाठी उपयोगात आणल्याने कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. परिणामी जिल्ह्यातील १८ हजार बचत गटांकडे एकट्या जिल्हा बँकेचे १३ कोटी रुपये कर्ज थकीत आहे. इतर बँकांचीही बचत गटाबाबत अशीच स्थिती आहे. कर्ज थकीत असल्याने जिल्हा बँकेने आता नव्याने कर्ज वाटप थांबविले असून यामुळे बचत गट आणखी अडचणीत आले आहे. महिलांना बचतीची सवय लागावी, त्यातून स्वयंरोजगार उभा राहावा, आर्थिक संपन्नता यावी यासाठी जिल्ह्यात बचत गट स्थापन करण्यात आले. अलिकडे या बचत गटाची चळवळ व्यापक प्रमाणात जिल्हाभर पसरली आहे. बचतगटाच्या माध्यमातून अनेकांनी उद्योग उभारत आपली प्रगती साधली आहे. जिल्ह्यात सुमारे २४ हजार बचत गट कार्यरत आहे. मात्र अलीकडे काही बचत गटांनी स्वयंरोजगाराच्या नावावर उचलेले कर्ज चक्क शेतीवर वापरल्याचे दिसून येत आहे. दोन वर्ष सलग दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने बचत गटांना कर्जाची परतफेड करता आली नाही. परिणामी जिल्हा बँकेतून कर्ज घेणारे तब्बल १८ हजार बचत गट थकीतच्या यादीत गेले आहे. या बचत गटांनी आतापर्यंत १० कोटी ३७ लाख रुपयांची जिल्हा बँकेत बचत केली. त्यावर जिल्हा बँकेने १३ कोटी ६२ लाख २६ हजार रुपयांचे कर्ज वितरित केले. यातील केवळ ७४ लाख रुपयांची वसुली झाली. उर्वरित १२ कोटी ८७ लाख ३६ हजार रुपये थकीत आहे. कर्ज वसुली होत नसल्याने जिल्हा बँकेने कर्ज वाटप थांबविले आहे. या कर्जाची वसुली करण्यासाठी बँकेला सहा वसुली अधिकारी नियुक्त करावे लागले. बहुतांश बचत गटांनी मिळालेल्या कर्जाची रक्कम शेती आणि शेतीशी निगडित व्यवसायावर लावली. परंतु दुष्काळी परिस्थितीने शेतीसोबतच व्यवसायही अडचणीत आले. त्यामुळे कर्जाची परतफेड थांबली आहे. त्यामुळे आता बचत गटाच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
बचत गटांकडे १३ कोटींचे कर्ज थकीत
By admin | Updated: February 9, 2015 23:20 IST