पुसद : बिबट्याची शिकार करून कातडे लंपास केल्याची घटना शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावरगाव बंगला जंगलात उघडकीस आली. या बिबट्यावर विष प्रयोग झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.पुसद तालुक्यातील सावरगाव बंगला जंगलामध्ये वनपथक बुधवारी गस्तीवर होते. कक्ष क्र.७१४ मध्ये एक जनावर चामडे सोललेल्या अवस्थेत आढळून आले. त्यावेळी हा बिबट्या असेल याचा कुणालाही अंदाज आला नाही. मात्र वनपथकाने अधिक तपास केला असता मृतदेहापासून काही अंतरावर बिबट्याचे कापून फेकलेले शीर आणि तीन पाय आढळून आले. त्यामुळे हा बिबट्याच असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती तत्काळ वरिष्ठांना देण्यात आली. वन अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली असता एक काठी आढळून आली. या काठीला बिबट्याचे केस चिकटलेले होते. शवविच्छेदन केले असता बिबट्याच्या पोटात केस आणि मासाचे तुकडे आढळून आले. त्यावरून बिबट्यावर विष प्रयोग झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे. हा बिबट्या वन कर्मचाऱ्यांना आढळला त्यावेळी बिबट्याला मारून ४८ तास झाले असावे असा अंदाज बांधला जात आहे. शिकाऱ्यांनी या बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे लंपास केल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. शेंबाळपिंपरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शकील खान यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. पुसद वनपरिक्षेत्रांतर्र्गत मोठ्या प्रमाणात सागवान तस्करीच्या घटना उघडकीस येत असताना आता वन्यजीवांच्या शिकारीही होत आहे. (वार्ताहर)
सावरगाव जंगलात बिबट्याची शिकार करून कातडे लंपास
By admin | Updated: October 25, 2014 01:46 IST