शिवसेना आघाडीवर : इतर पक्षांनीही राखले वर्चस्व, वणी तालुक्यात ४३ ठिकाणी झाली निवडवणी : वणी, मारेगाव, झरी तालुक्यात सोमवारी सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. या निवडीत राजकीय पक्षांना संमिश्र यश मिळाले. मात्र शिवसेनेने बहुतांश ठिकाणी आपला झेंडा फडकाविला.वणी तालुक्यात सोमवारी ४३ गावांमध्ये सरपंच, उपसरपंच निवड पार पडली. सार्वधिक चुरस राजूर-कॉलरी येथे होती. तेथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी पाच, शिवसेना व बसपाकडे प्रत्येकी, तीन, तर भाजपकडे एक सदस्य होता. सरपंच पदाच्या राष्ट्रवादी उमेदवार प्रणिता मो.असलम यांना राष्ट्रवादीच्या पाच सदस्यांसह शिवसेनेच्या तीन आणि बसपाच्या एका सदस्याने कौल दिल्यामुळे त्या नऊ विरूद्ध सात मतांनी विजयी झाल्या. विरोधी बसपाच्या ज्योती वेले पराभूत झाल्या. तेथे उपसरपंचपदासाठी घमासान झाले. काँग्रेसच्या चार, बसपाच्या तीन आणि भाजपाच्या एका सदस्याने बिना अजित सिंग यांना, तर राष्ट्रवादीच्या पाच, शिवसेनच्या तीन सदस्यांनी नितीन मिलमिले यांना कौल दिल्यामुळे समान आठ मते झाली. त्यामुळे अखेर ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात भाजपाच्या बिना सिंग उपसरपंचपदी विराजमान झाल्या. काँग्रेसचा एक सदस्य गैरहजर होता. पठारपूर, तेजापूर, शेलू-खुर्द, कैलासनगर, कुरली, शिवणी, कोलगाव, कोना, ढाकोरी, चनाखा, शेवाळा, कुंड्रा, मोहदा, पार्डी, कोलारपिंपरी येथील ग्रामपंचायतीवर शिवसेनेने सत्ता स्थापन केल्याचा दावा जिल्हा प्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केला. उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनीही शिंदोला परिसरातील ग्रामपंचायती शिवसेनेने ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.पठारपूर हे नांदेकर यांचे मूळ गाव आहे. तेथे शिवसेनेच्या माया किशोर नांदेकर सरपंच, तर मधुकर क्षीरसागर उपसरपंचपदी विराजमान झाले. तेजापूरच्या सरपंचपदी दादाजी बोरकर विरजमान झाले. कुंड्रा येथे पंचायत समिती सभापती सुधाकर गोरे यांच्या सौभाग्यवती उषा गोरे सरपंच बनल्या. कोना येथे निदेश दादाजी हनुमंते सरपंच, तर दीपक पेटकर उपसरपंच झाले. शेलू-खुर्दच्या सरपंचपदी रत्नमाला बेलेकर, उपसरपंच दिनेश पडाले, कैलासनगर सरपंच प्रवीण पिंपळकर, उपसरपंच नारायण गुंजेकर, कुर्ली सरपंच नीता बांदुरकर, उपसरपंच प्रवीण गेडाम, शिवणी सरपंच प्रकाश बल्की, उपसरपंच माया लांडगे, कोलगाव सरपंच त्रिवेणा उपरे, ढाकोरी सरपंच गीता येरगुडे, उपसरपंच मधुकर गोवारदीपे, चनाखा सरपंच भानुदास काकडे, उपसरपंच गजानन झाडे, शेवाळा सरपंच रामाजी भेंडाळे, साखरा उपसरपंच बंडू भोंगळे, परमडोह उपसरपंच संदीप थेरे, मोहदा सरपंच गौतमचंद सुराणा, उपसरपंच रवी गोवारदीपे, पार्डी सरपंच रेखा मोहितकर, उपसरपंच किशोर पारखी, डोर्ली उपसरपंच दिनेश आत्राम, वडगाव सरपंच मंगला आवारी, उपसरपंच निर्मल आसुटकर, तर कोलारपिंपरी उपसरपंच अतुल खोंडे शिवसेनेचे असल्याचा दावा नांदेकर यांनी केला आहे. नांदेपेरा येथे डाव्या आघाडीच्या तेजस्विनी घाटे सरपंच, तर एकनाथ संभाजी रायसिडाम उपसरपंचपदी विराजमान झाले. काँग्रेस, भाजपा, मनसेनेही काही ठिकाणी सरपंच पद ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. सर्व ठिकाणी शांततेत निवड पार पडली. (कार्यालय प्रतिनिधी)
सरपंच, उपसरपंच निवडीत संमिश्र यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2015 02:36 IST