सुविधांचा अभाव : परिसरात घाणीचे साम्राज्य, रात्री बसस्थानक असते बेवारसओंकार नरवाडे । लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या येथील बसस्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे. कोणत्याही सुविधा नसल्याने बसस्थानक केवळ नावापुरतेच राहले आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडे कुणाचेही लक्ष नाही.नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील महागाव हे विदर्भ-मराठवाड्याला जोडणारे महत्त्वाचे बसस्थानक आहे. १६ सप्टेंबर १९९३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या हस्ते बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले होते. बसस्थानकावरून १२० एसटी बसेस ये-जा करतात. त्यात सात बसेस मानव विकास मिशनच्या आहेत. या सर्व बसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन वाहतूक नियंत्रकाची आवश्यकता आहे. परंतु केवळ एकच वाहतूक नियंत्रक आहे. सकाळी १० वाजता येतात आणि ड्युटी संपली की साडेपाच वाजता निघून जातात. त्यामुळे रात्रभर बसस्थानक बेवारस असते. सुरक्षा रक्षक काय असतो, हे या बसस्थानकाला माहितच नाही.पुढील वर्षी बसस्थानक २५ वर्षांचे होत आहे. या कालावधीचा आढावा घेतल्यास काय आहे, यापेक्षा काय नाही याचीच यादी मोठी आहे. तीन एकर प्रशस्त जमिनीवर बसस्थानक उभारले आहे. बसस्थानकासाठी दीड एकर जमिनीचा उपयोग करण्यात आला. दीड एकर जमीन आजही ओसाड पडून आहे. या बसस्थानकावर सतत घाणीचे साम्राज्य असते. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधाही नाही. एक हातपंप असून त्यावरच तहान भागवावी लागते. येथे असलेली कॅन्टीन कायम बंद असते. बसस्थानकाच्या मालकीचे पाच दुकान गाळे आहे. परंतु सर्व दुकानांना टाळे ठोकलेले दिसून येते. बसस्थानकात येण्यासाठी व जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे. पूर्ण परिसर उखडलेला असून ठिकठिकाणी कचरा, प्रसाधनगृहाची दुर्गंधी, गुटखा, तंबाखू, प्लास्टिक पडलेले दिसून येते. विशेष म्हणजे, इमारत काळ्या जमिनीवर असल्याने ती एका बाजूला झुकत आहे. महागाव बसस्थानकाच्या दुरावस्थेकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असून लोकप्रतिनिधीही याविरुद्ध आवाज उठवत नाही.१७ बसेस जातात परस्परमाहुरवरून ये-जा करणाऱ्या १७ बसेस महागाव येथे बसस्थानकात न येता खडका-गुंज-पुसद या मार्गाने जातात. त्यात माहूर-शेगाव, शिर्डी, मुंबई, औरंगाबाद, पात्री, नेवासा, यावल, बीड या बसेसचा समावेश आहे. लांब पल्ल्याच्या बसेस महागाव बसस्थानकातून जाव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे. रातराणी बसेसही बसस्थानकात येत नाही. त्यामुळे प्रवाशांना पुसद अथवा धनोडा फाटा गाठावा लागतो. उत्पन्नाकडे दुर्लक्षबसस्थानकाच्या भरवशावर घसघशीत महसूल वसूल होवू शकतो. विद्यार्थी पासेसमधून वार्षिक १२ लाख रुपये उत्पन्न होते. ३५ लाख रुपये मानव विकास मिशनच्या बसेसमधून, तर पावणेदोन लाख रुपये परिसरातील दुकान गाळ्यांचे असे उत्पन्न असले तरी सुविधांकडे दुर्लक्ष केले जाते. विशेष म्हणजे, बसस्थानकाच्या जागेवर व्यावसायिक संकुल उभारल्यास उत्पन्नात भर पडेल.
महागाव बसस्थानक नावापुरते
By admin | Updated: June 30, 2017 02:03 IST