बेलोरा/पुसद : तस्करीतील लाकूड वाहून नेत असलेला ट्रक फसल्याने सागवान तस्करीची तिसरी घटना उघडकीस आली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या वन विभागाने ट्रक आणि सागवान लाकूड जप्त करून पाठ थोपटून घेतली. ही घटना पुसद वन परिक्षेत्रातील खंडाळा बिटमध्ये घडली. अल्पावधीत चौथी घटना उघडकीस आल्याने गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून वन विभागाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहे. पुसद वनपरिक्षेत्रातील खंडाळा बिटमधील राखीव वनातील कक्ष क्र. ३९८ मधील परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून नांदेड येथील तस्कर ट्रकद्वारे लाकूडसाठा वाहून नेत होते. दरम्यान, रस्त्याच्या कडेला हा ट्रक (एम.एच.२६/एच-१३२९) फसला. त्यामुळे पकडल्या जावू या भीतीने तस्कर लाकूड साठा आणि ट्रक सोडून पळून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती पुसद वनपरिक्षेत्र कार्यालयाला दिली. त्यावरून वनाधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रक आणि सुमारे साडेतीन घनमीटर सागवान लाकडाचे २९ नग जप्त केले. घटनास्थळावर आढळलेले विड्यांचे थुट, लेबल, दारूच्या रिकाम्या बाटल्या या वरून संबंधित तस्कर हे नांदेड आणि आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेवरील असावे, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. तसेच ट्रकवर नमूद असलेला क्रमांक हा बनावट निघाला असून जप्त करण्यात आलेल्या ट्रकचा खरा क्रमांक हा ए.पी.१५/डब्ल्यू-१३२९ असा आहे. या पूर्वी हिवरी वनपरिक्षेत्रात दोनदा आणि घाटंजी वन परिक्षेत्रातील साखरा राऊंडमध्ये अशाच प्रकारे ट्रक फसल्याने सागवान तस्करीच्या चार मोठ्या घटना उघडकीस आल्या. त्यावरून वन विभागाची गस्त कागदोपत्रीच होत असल्याचे पुढे आले आहे. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर धाकच राहिला नसल्याने वन्यजीवांबरोबर वन संपत्तीही धोक्यात आली आहे. (वार्ताहर)
वनवृत्तात सागवान तस्कर सक्रिय
By admin | Updated: August 17, 2014 23:26 IST