महागाव : सुमारे १५ वर्षांपूर्वीच महागाव या तालुका केंद्रावर ग्रामीण रुग्णालय निर्मितीला मान्यता देण्यात आली. मात्र आजवर निधीच प्राप्त झाला नाही. महागाव तालुक्यात शेकडो गावे आहेत. स्थानिक आरोग्य उपकेंद्रावरच हजारो लोकांच्या आरोग्याची जबादारी आहे. वाढत्या लोकसंख्येने आता तरी शासन तालुक्याला ग्रामीण रुग्णालय देईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुमारे १५ वर्षापूर्वीच म्हणजे अॅड़ अनंतराव देवसरकर आमदार असताना त्यांनी महागाव येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न केले. त्यावेळी रुग्णालयाच्या निर्मितीला मान्यताही देण्यात आली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत माजी आमदार देवसरकर यांचा पराभव झाला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न ‘जैसे थे’च राहिला. त्यांच्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी झाले. मात्र कुणीही ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले नाही. शासनाने दरम्यानच्या काळात यवतमाळ जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालये दिली. महागाव तालुका मात्र अपवाद राहिला. परिणामी स्थानिक आरोग्य केंद्रांवरच हजारो नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी येऊन पडली. तालुक्याच्या ठिकाणी सर्व सोयींनी सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय झाल्यास नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यास सहज शक्य होऊ शकते. परंतु याचा विचारच होत नसल्याने गेल्या १५ वर्षांपासून महागावच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न खितपत पडला आहे. त्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. (शहर प्रतिनिधी)कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेवरच भरमहागाव तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी स्थानिक आरोग्य उपकेंद्रावरच आहे. तेथे आधीच तोकडे मनुष्यबळ त्यात वैद्यकीय अधिकारी आणि बहुतांश कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नाही. त्यामुळे मलमपट्टी आणि थातूरमातूर उपचारा पलिकडे काहीही केले जात नाही. परिणामी परिस्थिती नसताना नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते या उलट आरोग्य उपकेंद्रांमध्ये केवळ कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांवरच भर दिल्या जात असल्याचे दिसून येते.
१५ वर्षांपासून ग्रामीण रुग्णालय रखडलेलेच
By admin | Updated: December 20, 2014 02:08 IST