हिवरी : यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरात खरिपाच्या लागवडीनंतर कृषी विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने येऊन पाहिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शास्त्रीय मार्गदर्शनच मिळत नाही. केवळ संबंधित कृषी सहाय्यक गावात येतो व योजनेसंदर्भात माहिती सांगून जातो. शेतकऱ्यांना सध्या खरी गरज आहे ती कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची. परंतु कृषी विभागातील अधिकारी वर्गाला हिवरी परिसराची अॅलर्जी असल्याचे दिसून येते. सुरूवातीला पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी काळजीेत होते. त्यातून कसेबसे वाचले असताना आता पीक दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून पिके डोलू लागली आहेत. त्यामुळे शेतकरीही आनंदात होते. परंतु अशातच सोयाबीन व कपाशीवर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशावेळी वेळीच बंदोबस्त केल्यास पिकांची सरासरी घटणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खरी गरज आहे ती पीक पाहणी करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन कुठल्या रोगावर कोणते औषध फवारावे तसेच कोणत्या पिकांना कोणते खत द्यावे आदी माहितीची नितांत गरज आहे. परंतु कृषी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे कृषी केंद्र चालकाच्या मर्जीप्रमाणे महागडी औषधे घेऊन शेतकरी फवारणी करीत आहेत व पिकांना खत देत आहेत.फवारणी केल्यानंतर किंवा खत दिल्यानंतर त्याचा कोणताही फायदा या पिकांना झालेला नाही, असा हिवरी परिसरातील व इतर गावातीलही शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा दिसून येते. याबाबत संबंधित कृषी केंद्रात जाऊन विचारणा केल्यास वातावरणातील बदल किंवा फवारणीचे पाणी अस्वच्छ असणे, जास्त पाणी टाकणे, कमी औषध टाकल्यामुळे हा प्रश्न निर्माण होत असल्याचे कृषी केंद्र चालकांकडून सांगितल्या जाते. यातील खरे कारण म्हणजे ज्या घटकांची ज्यावेळी, ज्या पिकांना गरज असते ते घटक माहिती अभावी शेतकरी पिकांना देऊ शकत नाही. त्यानंतर कोणतेही औषध फवारून किंवा खते देऊन त्याचा पिकांना आवश्यक तो फायदा होत नाही. त्यामुळे अशावेळी शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांची खरी गरज असते. याकडे जिल्हा कृषी अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमध्ये होत आहे. (वार्ताहर)
जिल्हा कृषी विभागाला ग्रामीण परिसराची अॅलर्जी
By admin | Updated: August 31, 2015 02:16 IST