हंसराज अहीर : वीज अधिकारी व कंत्राटदारांसोबत बैठकयवतमाळ : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना जलदगतीने वीज कनेक्शन देण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात यावी. येत्या काही दिवसात अधिकाधिक शेतकऱ्यांना कनेक्शन दिले गेल्यास रब्बी हंगाम घेता येईल, त्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.बचत भवन येथे शेतकऱ्यांच्या वीज जोडणीबाबत वीज वितरणचे अधिकारी व कंत्राटदारांची बैठक त्यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर यांच्यासह वीज वितरणचे सर्व अधिकारी तथा कंत्राटदार उपस्थित होते. शासनाने वीज कनेक्शनसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आहे. आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कनेक्शनच्या कामात विलंब न करता जलदगतीने कामे होणे आवश्यक आहे. त्यासाठी कनेक्शनची धडक मोहीम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी तालुकानिहाय प्रलंबित कनेक्शन व कनेक्शन देण्यासाठी होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. तालुकानिहाय कंत्राटदारांना वीज जोडणीचे दिलेले काम व त्यांची प्रगतीही त्यांनी जाणून घेतली. ज्या कंत्राटदरांचे काम समाधानकारक नाही त्यांना कामात गती आणण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कनेक्शनचे काम करण्यासाठी आवश्यकता वाटल्यास अधिक कंत्राटदार नेमा. कंत्राटदारांकडून गतीने कामे करून घ्या. जोडणीचा दर आठवड्यात नियमित आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हंगाम पाहता जोडण्या लगेच उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. शिवाय जिल्ह्याचे खरीप क्षेत्रही वाढण्यास मदत होणार आहे, असे ते म्हणाले. ज्या कंत्राटदारांचे काम नोव्हेंबरअखेर समाधानकारक नसतील अशा ठिकाणी इतर कंत्रादरांकडून काम करून घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.कनेक्शन देताना ज्या गावांमध्ये अधिक कनेक्शन प्रलंबित आहे, अशा गावांना प्राधान्य दिले जावे. धडक सिंचन योजनेच्या विहिरींना कनेक्शन देताना ज्या ठिकाणी स्वतंत्र ट्रान्सफार्मर लावण्याची आवश्यकता आहे, तेथे स्वतंत्र ट्रान्सफार्मर न देता अशा पंपांना सौरऊर्जेचे कनेक्शन दिले जावे. यामुळे शिल्लक राहणारे ट्रान्सफार्मरद्वारे इतर पंपांना कनेक्शन देण्यासाठी वापर करता येतील, असे त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)अधिकारी, कंत्राटदारांनी समन्वय ठेवावाकृषिपंपांना वीज कनेक्शन देण्यासाठी उत्तम काम करणारे अधिकारी, कंत्राटदार यांचा गौरव करणार असल्याचे हंसराज अहीर यांनी सांगितले. अधिकारी, कंत्राटदारांनी आपसात समन्वय ठेऊन काम करा. शासनस्तरावर त्यांची दखल घेऊन गौरव केला जाईल, असे ते म्हणाले.
कृषिपंप वीजजोडणीसाठी धडक मोहीम राबवावी
By admin | Updated: October 31, 2015 00:25 IST