कॅशिअरवर गुन्हा दाखल : खातेदारांची रक्कम परस्पर घशातयवतमाळ : येथील राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट कॉपरेटीव्ह सोसायटीच्या मेनलाईन शाखेत तब्बल ३३ लाख ८९ हजार ३३८ रुपयांची अफरातफर उघडकीस आल्याने खातेधारकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान यवतमाळ शहर पोलिसांनी या प्रकरणी त्या शाखेच्या रोखपालाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या अपहाराची व्याप्ती किती आणि आणखी कुणाचा सहभाग आहे का या दिशेने पोलीस तपास करीत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजलक्ष्मी मल्टीस्टेटच्या मेन लाईन शाखेतील रोखपाल निखील गजानन गवळी याच्याविरोधात फसवणूक आणि खोटे दस्तावेज तयार करून वापरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गवळी ३ डिसेंबर २०१३ पासून या पतसंस्थेत लिपिक या पदावर कार्यरत होते. नंतर त्यांच्याकडे रोखपाल या पदाची जबाबदारी देण्यात आली. या काळात गवळी यांनी दैनिक व्यवहारामध्ये रोख रकमेत ठेवीचे व कर्ज व्यवहारात खोटे व बनावट कागदपत्र तयार करून अफरातफर केली. ही रक्कम शाखेतील इतर बँकेच्या खात्यात जमा करणे आवश्यक असताना त्याचा स्वत:करिता उपयोग केला. यवतमाळ अर्बन को-आॅपरेटीव्ह बँक, हिंगोली पिपल्स को-आॅपरेटीव्ह बँक येथे राजलक्ष्मी पतसंस्थेच्या शाखेचे खाते आहे. या खात्यांमध्ये रकमेचा भरणाच केला गेला नाही. याशिवाय कर्ज खातेदार पियूष पराजिया यांच्या ‘ओडी’ची कर्ज रक्कम भरणा केली नाही. मुदत ठेवीबाबत खोटे दस्तावेज तयार करून त्याचा स्वत: लाभ घेतला. यामध्ये नऊ खातेधारकांचा समावेश आहे. हा प्रकार खातेदारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची तक्रार राजलक्ष्मी मल्टीस्टेटच्या मार्इंदे चौकातील मुख्य शाखेकडे केली. त्यावरून येथील उपसरव्यवस्थापक संतोष पूनमचंद छापरवाल यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. यावरून निखील गवळी यांच्याविरोधात पोलिसांनी फसवणूक, खोटे दस्तावेज बनवणे, त्याचा वापर करणे, आर्थिक अनियमितता करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल केले. या अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. मुख्य शाखेपर्यंत अपहाराची पाळेमुळे असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या अपहार प्रकरणामुळे संस्थेच्या खातेधारकात, ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर पोलिसांच्या तपासात राजलक्ष्मी मल्टीस्टेटमधील आणखी काही घबाड उघड होतील का याकडे खातेदारांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार नंदकिशोर पंत यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संग्राम ताटे करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
राजलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये ३४ लाखांची अफरातफर
By admin | Updated: January 13, 2017 01:28 IST