यवतमाळ : धामणगाव रोड स्थित कॉटन मार्केट चौकात पोलीस चौकीच्या बाजूला चालणारा मटका अड्डा सोमवारी पहाटेच अचानक गुंडाळण्यात आला. त्यावर पोलिसांनी आम्हीच ही कारवाई केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात पोलिसांच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने मटका व्यावसायिकाने स्वत:च पुढाकार घेऊन हा अड्डा तूर्त गुंडाळला.यवतमाळ शहरात पोलिसांच्या साक्षीने कसे मटका-जुगार अड्डे चालविले जातात याचे स्टिंग आॅपरेशन ‘लोकमत’चमूने रविवारी केले. त्याचे सविस्तर वृत्त व लाईव्ह छायाचित्रे सोमवारच्या अंकात प्रकाशित होताच जिल्हाभरातील अवैध व्यावसायिक आणि पोलिसांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. सर्व ठाणेदारांनी आपल्या हद्दीतील अवैध धंदे तूर्त नियंत्रणात ठेवण्याच्या सूचना दिल्या. यवतमाळातील कॉटन मार्केट चौकातील ज्या मटका अड्ड्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले तो अड्डा पहाटेपासूनच गुंडाळणे सुरू झाले. रस्त्यावरून सहज दिसणाऱ्या या अड्ड्याच्या दर्शनी भागाला दोन ताट्या लावून त्याला पोते बांधण्यात आले होते. मात्र ‘लोकमत’च्या वृत्तानंतर आपल्या अड्ड्याची ओळख पटू नये म्हणून ते पोते काढून घेण्यात आले. शिवाय अड्ड्यावर आकडे लिहिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाट्या, फलक व अन्य साहित्य तत्काळ हटविण्यात आले. सदर प्रतिनिधीने सोमवारी सकाळी ११.३० वाजता या मटका अड्ड्यावर भेट दिली असता तेथील चित्र रविवार पेक्षा वेगळे होते. रविवारी या अड्ड्यावर प्रचंड गर्दी होती. मटका, आकडा लावण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती. मात्र सोमवारी या अड्ड्यावर शुकशुकाट होता. येथे जुगार अड्डा असल्याच्या कोणत्याही खुणा राहणार नाही याची खबरदारी घेतली गेली होती. मात्र मटक्याच्या फाटलेल्या चिठ्ठ्या या अड्ड्याच्या परिसरात आजही पुरावा म्हणून पडून होत्या. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमुळे खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी सकाळपासूनच सारवासारव सुरू केली होती. ऐन रस्त्यावर चालणारे अड्डे सायंकाळपर्यंत बंद होते तर काही चोरट्या मार्गाने चालविले जात होते. यवतमाळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही पोलिसांनी कारवाईचा देखावा निर्माण करून खानापुरती केली. (लोकमत चमू)
मटका अड्डा गुंडाळला
By admin | Updated: December 8, 2014 22:39 IST