उमरखेड पंचायत समिती : शेतकरी झिजवितात उंबरठेउमरखेड : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात करण्यात आलेल्या सिंचन विहिरीसह विविध कामांचे तब्बल दीड कोटी रुपयांचे देयके रखडले आहे. पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराने शेतकऱ्यांना उंबरठे झिजवावे लागत आहे.उमरखेड पंचायत समितीअंतर्गत एप्रिल ते जून या काळात रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे करण्यात आली. त्यात सिंचन विहिरी, पडझड विहिरी, शौचालय, घरकूल, शौच खड्डे, गांडुळखत निर्मितीकरिता खड्डे आदींचा समावेश होता. यामध्ये सर्वाधिक कामे सिंचन व पडझड झालेल्या विहिरींची होती. ३०० सिंचन विहिरी आणि ६६२ पडझड झालेल्या विहिरींची दुरुस्ती करण्यात आली. या सर्व कामावर चार हजारापेक्षा जास्त मजूर राबले. एप्रिल ते जून महिन्यात झालेल्या कामात मजुरांना त्यांची देयके अदा करण्यात आली. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहिरीचे बांधकाम करण्यात आले त्याकरिता लागणारे सिमेंट, गज, तार, गिट्टी, रेती हे साहित्य शेतकऱ्यांनी पदरमोड करून खरेदी केले तर काहींनी खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून बांधकाम पूर्ण केले. वास्तविक काम पूर्ण झाल्यानंतर जून महिन्यात या कामाचे पैसे अदा करणे आवश्यक होते. परंतु पंचायत समितीचे लेखापाल आणि विस्तार अधिकाऱ्याच्या दिरंगाईमुळे या देयकाची बिले गटविकास अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसाठी पोहोचलीच नाही.तालुक्यातील झाडगाव, मुळावा, नागापूर, बारा, बेलखेड, बिटरगाव, मार्लेगाव, खरूस, परजना, बाळदी, पिरंजी, चिल्ली, सुकळी, बोथा, नागेशवाडी, निगनूर, मुरली, जेवली, बिटरगाव बु., अकोली, थेरडी, बोरी, लिंगी, जवराळा, सोनदाबी, मोरचंडी, एकंबा आदी गावातील ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे पैसे रखडले आहे. सर्व विहिरींच्या कामाची कुशल देयके रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी अभियंत्याकडून तयार करून मान्यतेसाठी विस्तार अधिकारी, लेखापाल व गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली. परंतु दीड कोटी रुपयांचे बिल अद्यापही गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाही. त्यावर स्वाक्षऱ्या झाल्या नाही. याचा फटका लाभार्थी शेतकऱ्यांना बसत आहे. (शहर प्रतिनिधी)
रोहयोचे दीड कोटी रखडले
By admin | Updated: August 25, 2016 01:52 IST