वणी : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची लूट सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.तालुक्यातील नागरिकांना खरेदी-विक्री व इतर व्यवहाराकरिता येथील दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागते़ सध्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी व्यवहार आॅनलाईन पध्दतीने चालतो़ याकरिता पूर्वी डीडी रजिस्ट्रेशन फी बँकेमार्फत काढावी लागत होती़ मात्र जेव्हापासून आॅनलाईन पध्दत सुरू झाली, तेव्हापासून आॅनलाईन रजिस्ट्रेशन फीची पावती काढावी लागत आहे. मुद्रांकाच्याही बाबतीत तसेच झाले आहे. सध्या ३० हजारांच्या वर मुद्रांक नसल्याने तेसुध्दा आॅनलाईन रक्कम भरून त्याचीही पावती काढावी लागते़ एक प्रकारे ग्राहकांसाठी आॅनलाईन पध्दत अत्यंत सुटसुटीत आहे. मात्र ज्या ग्राहकांना संगणकाचे ज्ञान असेल, अशाच ग्राहकांना ही पद्धत कळते. त्यांचे कामही त्यामुळे सहज झाले आहे. तथापि ज्यांना संगणकाचे कोणतेही ज्ञान नाही, अशा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही आॅनलाईन पध्दत डोकेदुखी ठरली आहे़ ज्या ग्राहकांना संगणकाचे ज्ञान नाही, अशा ग्राहकांची या कार्यालयात लूट होत असल्याची ओरड होत आहे.या कार्यालयात अनेक नागरिक त्रागा करतात. मात्र अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात, अशी नागरिकांची ओरड आहे. या कार्यालयात दस्त नोंदणीसाठी तालुक्यातील सर्वच नागरिकांना यावे लागते. अनेकदा त्यांना ‘कनेक्टिव्हिटी’चा फटका बसतो. त्यामुळे त्यांच्या कामात दिरंगाई होताना दिसते. त्यांना तास न् तास उभे राहून वाट बघावी लागते. वणी तालुका खरेदी-विक्री व्यवहारात अग्रेसर आहे. त्यातून शासनाला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळतो. मात्र नागरिकांना रजिस्टर नोंदणी फी काढतानाही आॅनलाईनची फी द्यावी लागते़ त्यामुळे एका दस्तऐवजाचा ग्राहकांना किमान एक हजार रूपयांपर्यंत खर्च येतो़ यापूर्वी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच दुय्यम निबंधकांनी कार्यालय परिसरात आॅनलाईन रजिस्ट्रेशन फीचे पैसे किती घ्यायला पाहिजे, याबाबत सूचना फलक लावले होते. त्यामुळे ग्राहकांची लूट काही काळ थांबली होती़ तसेच यापूर्वी दुय्यम निबंधकांनी आॅनलाईनची सक्तीही केली नव्हती़ मात्र आता रजिस्ट्रेशन फीचे पुन्हा जादा पैसे उकळ्यात येत असल्याची ओरड ग्राहकांकडून सुरू झाली आहे. काही मुद्रांक विके्रते व दुय्यम निबंधक कार्यालय परिसरात संगणक थाटून बसलेले ग्राहकांकडून डाटा एंन्ट्रीसाठी २०० रूपये, रजिस्ट्रेशन शुल्क म्हणून २००, मुद्रांक शुल्क २०० रूपये, आकारत असल्याची ओरड होत आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच या सर्वांसाठी केवळ ५० रूपये शुल्क करण्यात आले होते, हे विशेष. (कार्यालय प्रतिनिधी)
वणीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जनतेची लूट
By admin | Updated: November 16, 2014 22:55 IST