सर्वसामान्यांना दिलासा : पंजाब आणि उत्तर प्रदेशात तांदळाचे पीक भरघोस झाल्याचा परिणाम पुसद : सर्वसामान्यांचे महागाईने कंबरडे मोडले असताना दुसरीकडे मात्र बासमतीसह तांदळाचे दर ५०० ते १००० रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले आहेत. मात्र तांदळाचे दर घसरल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. बाजारात सध्या तांदळाचे दर ५०० ते १००० रुपयाने उतरले आहेत. तांदळाचे दर उतरल्याचे गेल्या तीन वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. वार्षिक तांदूळ खरेदीसाठी हा काळ आदर्श आहे. याशिवाय डाळीचे दरही उतरले असून, खासकरून मूग व उडीद स्वस्त झाले आहेत. ग्राहकांनी तांदूळ व डाळी खरेदी करण्यास हरकत नाही. विशेष म्हणजे दर घसरल्याने तांदूळ महोत्सव सुरु झाले आहे. शहरातील होलसेल तांदूळ विक्रेत्यांनी तांदूळ महोत्सवाचे दालन सुरू केले असून, या महोत्सवात ग्राहकांना अनेक प्रकारचे तांदूळ पाहावयास मिळले. होलसेलमध्ये यंदा बासमती पावणेचार हजार ते सात हजार रुपये क्विंटलने विकला जात आहे. गेल्या वर्षी हा दर तब्बल नऊ हजार ते १२ हजार रुपये क्विंटल होता. बासमतीचे तुकडा, वनफोर, थ्रीफोर आणि मागेरा असे अनेक प्रकार उपलब्ध असून, ग्राहकांकडून या तांदळला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तांदळाचे दर का कमी झाले याबाबत विक्रेत्यांशी चर्चा केली असता पंजाब व युपी राज्यात तांदूळाचे पीक भरघोस आले. याशिवाय तांदळाच्या निर्यातीवर आलेल्या मर्यादाही व्यापारी वर्गाच्या व उत्पादकांच्या पथ्यावर पडल्याने तांदळाचे दर कमी झाल्याचे बोलले जात आहे. यंदा पुसद शहरात गेल्या दोन-तीन वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने तांदूळ मागवला असून, दर कमी असल्याने व्यापारीदेखील अधिक खरेदी करीत असून, तसेच ग्राहकांना होलसेल दरात तांदूळ उपलब्ध होत आहेत. बाजारात डाळीची आवक वाढल्याने उडीद, मूग डाळीचे दर उतरले असले तरी तूरडाळ अजूनही महागाच आहे. दरम्यान दर कमी सल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. सध्या तूरडाळ १३० ते १४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. मुंगडाळ ८०, उडीद १०० रुपये किलो दराने किरकोळ बाजारात विकली जात आहे. मूंग मोगर १०० रुपये किलो, उडीद मोरग १४० रुपये किलो, उडीद डाळ आणि मुगाच्या डाळीची आवक कर्नाटक, तामिलनाडू, गुजरातसह विदर्भातून होत आहे. हरभरा डाळ ६० रुपये किलो, बरबटी डाळ ७० रुपये, लाख डाळ ६० रुपये किलो या भावात मिळत आहे. उडीद व मुगाचे दर उतरलेले असून, गेल्या वर्षीपेक्षा एक हजाराने या दोन्ही डाळीचे दर उतरले आहेत. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
बासमतीसह तांदळाचे दर घसरले, तूर डाळ तेजीतच
By admin | Updated: February 9, 2016 02:10 IST