जिल्हा परिषद : रविवारी कर्मचारी गणवेशात यवतमाळ : जिल्हा परिषद सभागृहात विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी रविवारी येथील विविध योजनांचा आढावा घेतला. आयुक्तांच्या धसक्याने चक्क सुटीच्या दिवशीही अनेक कर्मचारी गणवेशात बैठकीला हजर झाले होते. जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण मोहोड, राजेश गायनर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आयुक्तांनी प्रथम जलयुक्त शिवार, सिंचन विहिरी, शेततळे, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना, शबरी आवास योजना, विकासात्मक कार्यक्रमांचा आढावा घेतला. यानंतर विभागीय चौकशी प्रकरणे, निलंबन, अनधिकृत गैरहजेरी, अखर्चीत निधी, आश्रमशाळा, पीएचसी, शाळा, वसतिगृहे यांना दिलेल्या सरप्राईज भेटीचे अहवाल, बालमृत्यू, अब्दुल कलाम आहार योजना, सर्व्हीस बुकाचे अद्यवतीकरण, सेवानिवृत्तीधारकांच्या प्रलंबित असलेल्या पेन्शन केसचा आढावा घेतला. लगेच न्यायालयीन प्रकरणे, मॅट, उच्च न्यायालयातील प्रकरणे, शाळाबाह्य मुले, आरटीई, शाळा बांधकाम, कृषी विभाग, अनुकंपा प्रकरणे आदींची माहिती जाणून घेतली. दुसऱ्या सत्रात प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याच्या तक्रारींचा आढावा घेतला. लोकायुक्तांकडे प्रलंबित प्रकरणे, खासदार, आमदारांनी संदर्भ दिलेली प्रलंबित प्रकरणे आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचाही आढावा घेतला. या आढावा सभेसाठी अधिकारी, कर्मचारी अगदी तयारीतच आले होते. (शहर प्रतिनिधी)सोमवारी महसूलचा आढावाविभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यवतमाळात मुक्कामी राहणार आहे. दुसऱ्या दिवशी सोमवारी ते जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाचा आढावा घेतील. त्यामुळे रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातही अनेक अधिकारी, कर्मचारी आढावा बैठकीच्या तयारीत गुंतून असल्याचे दिसत होते. आयुक्तांनी प्रथमच संबंधित जिल्ह्यात पोहोचून आढावा घेण्याचा नवीन पायंडा निर्माण केला. यामुळे प्रशासन गतीमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यानंतर ते अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा जिल्ह्याचा आढावा घेणार आहे. शेगाव येथेही विकास आराखडा स्थळाची पाहणी करणार आहे.
आयुक्तांनी घेतला योजनांचा आढावा
By admin | Updated: October 17, 2016 01:40 IST