साठेबाजांचे धाबे दणाणले : नदी तुडुंब भरण्यापूर्वी तस्करांनी लढविली शक्कलयवतमाळ : पावसाळ्यात नदी तुडुंब भरल्यानंतर रेती उत्खनन करणे अशक्य होणार असल्याने रेती तस्करांनी नामी शक्कल लढविली. रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून त्याची साठेबाजी सुरू केली आहे. आता महसूल प्रशासनाने रेती साठ्याविरुद्ध मोहीम उघडली असून ठिकठिकाणी धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील रेती घाटावरून हजारो ब्रास रेतीचे उत्खनन केले जाते. लिलाव न झालेल्या रेती घाटावरही मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन उन्हाळाभर करण्यात आले. तर लिलाव झालेल्या रेती घाटावरून क्षमतेपेक्षा मोठ्याप्रमाणात उत्खनन करण्यात आले. आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून पावसाळ्यात नदी पात्र पाण्याने तुडुंब भरुन जाते. त्यामुळे रेती उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत रेती चढ्या भावाने विकण्यासाठी अनेक तस्कर रेतीचा साठा करतात. नदी पात्रालगत अथवा मोकळ्या मैदानात रेतीचे साठे केले जातात. रेतीच्या साठेबाजीविरुद्ध प्रशासनाने आदेश दिले आहे. रेती साठ्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील विविध ठिकाणी रेतीचे साठे दिसून येतात. यवतमाळ शहरातील मोकळ्या मैदानात रात्रीतून रेती आणली जाते. त्यानंतर ही रेती बांधकामासाठी विकली जाते. शहरात पाणीटंचाईमुळे बांधकाम खोळंबले होते. परंतु आता पावसाळा सुरू झाल्याने बांधकामांनी वेग घेतला आहे. या बांधकामासाठी रेतीची आवश्यकता आहे. परंतु नदी पात्रात पाणी साचल्याने रेती काढणे अशक्य होत आहे. त्यामुळेच उन्हाळ्यात रेतीचा साठा अनेकांनी करून ठेवला होता. आता त्याच साठ्यावरून विक्री सुरू आहे. हा प्रकार महसूल प्रशासनाच्या लक्षात येताच धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. बाभूळगाव, उमरखेड, आर्णी येथे धाडी टाकून रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली नाही. महसूल प्रशासनाने शहर आणि रेती घाटाचा परिसर नजरे खालून घातला तरी रेतीचे साठे मोठ्या प्रमाणात दिसून येतील. (प्रतिनिधी) बाभूळगाव तालुक्यात नऊ लाखांचा रेतीसाठा जप्तबाभूळगाव तालुक्यात तहसील कार्यालयाकडून विविध ठिकाणी धाडी मारून अवैधरित्या जमा करून ठेवलेला रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. सिद्धी शिवारात आशिष ठाकरे याने तीन लाख रुपये किंमतीची १५० ब्रास रेतीचा साठा करून ठेवला होता. याच परिसरात रणजित देशमुख याने दोन लाख रुपये किंमतीचा १०० ब्रास रेतींचा तर सवजना शिवारात सचिन झोड याने दोनशे ब्रास रेती चार लाख रुपयांची जमा करून ठेवली होती. या तिन्ही ठिकाणी धाडी मारून तहसील कार्यालयाने कारवाई केली. या प्रकरणी तिन्ही रेती साठेबाजांवर सिध्दी येथील तलाठी ज्ञानेश्वर कुंभरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले असून अनेकांनी साठा हलविणे सुरू केल्याचे जिल्ह्यात दिसत आहे.
रेतीसाठ्याविरूद्ध महसूलचे धाडसत्र
By admin | Updated: July 7, 2016 02:30 IST