‘एसबीआय म्युच्युअल फंड’च्या परताव्यासाठी गुंतवणूकदाराला येरझारा यवतमाळ : स्टेट बँकेच्या म्युच्युअल फंड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाला परताव्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने येरझारा माराव्या लागत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिंघानियानगर येथील गजानन दादाराव राजगुरे यांनी थेट स्टेट बँकेच्या मुंबई येथील महाव्यवस्थापकांकडे १६ फेब्रुवारी रोजी दाद मागितली आहे. राजगुरे यांनी ५ जुलै २००७ रोजी एसबीआय म्युच्युअल फंडचे ५०० युनिट खरेदी केले होते. आठ वर्षानंतर त्याचा परतावा मिळण्याची वेळ आली. म्हणून त्यांनी सप्टेंबर २०१६ ला स्थानिक एसबीआय कार्यालयातील म्युच्युअल फंड संबंधी नियुक्त कर्मचारी विनय वाघमारे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी जादा शिपाई नसल्याने तुमचे पाकीट चेन्नईला परत पाठविल्याचे सांगितले. या पाकिटाबाबत कुरिअर सर्व्हिस कार्यालयात जाऊन चौकशी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वारंवार येरझारा मारुनही वाघमारे यांच्याकडून समाधान झाले नाही. गजानन राजगुरे २ फेब्रुवारीला पुन्हा बँकेत गेले असता वाघमारे यांच्याकडील काम स्वप्नील तुरखडे यांना देण्यात आल्याचे सांगितले जाते. तुरखडे यांची भेट होण्यास तब्बल आठ ते दहा दिवस लागले. विशेष असे त्यांचा मोबाईल क्रमांक अन्य कर्मचारी किंवा शाखा व्यवस्थापकांनाही माहीत नव्हता. तुरखडे यांनी पुन्हा पॅन कार्ड, आधार कार्ड याच्या झेरॉक्स मागितल्या. मात्र त्यांनी कॉम्प्युटर सेंटर यवतमाळ किंवा चेन्नई ट्रस्टशी संपर्क केला नाही. पर्यायाने राजगुरे यांना गुंतवणूक केलेल्या रकमेचा अद्यापही परतावा मिळालेला नाही. एकूणच एसबीआय म्युच्युअल फंडच्या परताव्यासाठी गुंतवणूकदारांना प्रचंड त्रास होत असल्याचे उघड झाले आहे. यासंबंधी कर्मचारी कोण, त्याचा मोबाईल क्रमांक, त्याच्या वरिष्ठाचा नाव-क्रमांक असे काहीही स्टेट बँकेत लिहिलेले नसल्याने गुंतवणूकदार व ग्राहकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत असल्याचे राजगुरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. वारंवार तीच ती कागदपत्रे मागण्याच्या एसबीआयच्या पद्धतीमुळे वैताग आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
एसबीआय म्युच्युअल फंड’च्या परताव्यासाठी गुंतवणूकदाराला येरझारा
By admin | Updated: February 18, 2017 00:19 IST