यंदा वणी तालुक्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांच्या पेरण्या योग्यवेळी झाल्या. मृग नक्षत्रापासून तर पुष्य नक्षत्रापर्यंत पिकांना पूरक पाऊस पडला. त्यामुळे पिके चांगलीच बहरली होती. निंदण, खुरपणीसह पिकांना खतांची मात्रा योग्य वेळी मिळाल्यामुळे पिके समाधानकारक अवस्थेत होती. मात्र, २ ऑगस्टला सुरू झालेल्या आश्लेषा नक्षत्रात पावसाने दगा दिला. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेली पिके सुकू लागली. जमिनीला भेगा पडल्या. सोयाबीन पिकांची अकाली फुलगळ सुरू झाली. त्यामुळे हाती आलेली पिके जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत होते. हलक्या मुरमाळ जमिनीतील पिके शेवटच्या घटिका मोजत होते. तथापि, सोमवारी सुरू झालेल्या मघा नक्षत्राच्या प्रारंभीच मंगळवारी सायंकाळी पाऊस सक्रिय झाला. त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. नेहमी पडणाऱ्या पावसाच्या अनुभवावरून ‘मघा देतो दगा’ ही म्हण शेतकऱ्यांत प्रचलित आहे. मात्र, यंदा मघा नक्षत्रानेच पिकांना संजीवनी दिली आहे.
पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी सुखावला : आश्लेषाने मारले, मघाने तारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:49 IST