स्थायी समिती सभा : तेलंगणा, आंध्रप्रमाणे मदतीची मागणी यवतमाळ : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंंबाना लगतच्या तेलंगणा, आंध ्रप्रदेशप्रमाणे पाच लाख रुपयांची मदत करावी, असा ठराव शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना एक लाखांची मदत दिली जाते.स्थायी समिती सभा उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. समितीने कृषी विभागाच्या वैयक्तीक लाभाच्या योजनांचा रबी हंगामापूर्वी शेतकऱ्यांना साहित्य वाटपाचा निर्णय घेतला. इलेक्ट्रीक कृषीपंप, पाईप याचे वितरण करण्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर कृषी समितीचे सभापती त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला. यापुढे जिल्हा परिषद स्वीय निधीच्या खर्चाचे विवरण प्रत्येक बैठकीत ठेवण्याचे निर्देश मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. सदस्य देवानंद पवार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीचा मुद्दा उपस्थित केला. शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत वाढ केली आहे. आता चार लाख रूपये मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दिले जाते. आता ही रक्कम पाच लाख करण्याची मागणी शासनाकडे करावी, असा प्रस्ताव पवार यांनी ठेवला. याला समितीने मंजुरी दिली. शिवाय रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना विहिरीचे वाटप केले जाते. याची प्रतीक्षा यादी प्रत्येक ग्रामपंचायतीने ३० सप्टेंबरपर्यंत प्रसिध्द करावी, त्यानंतर २ आॅक्टोबरच्या सभेत मंजुरी दिला जावी, असे निर्देश देण्याचा निर्णय झाला. घाटंजी तालुक्यातील आमडी येथे एका कंपनीच्या कपाशीला फलधारणाच होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)
आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी पाच लाखांच्या मदतीचा ठराव
By admin | Updated: September 25, 2015 03:07 IST