यवतमाळ : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखा यवतमाळच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वित्त अधिकारी शहापूरकर यांची उपस्थिती होती. शासनाच्या आदेशानुसार दर तीन महिन्यानंतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेण्यात येऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्याबाबत यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरून काढणे, पदान्नत्यांचा प्रश्न निकाली काढणे, ज्येष्ठता यादीतील अनियमितता दूर करून सुधारित ज्येष्ठता याद्या तयार करणे व त्यानुसार पदोन्नत्या देणे, रोस्टरप्रमाणे पदोन्नत्या करणे आदींसह इतर महत्वाच्या मागण्यांचा समावेश निवेदनात आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच या समस्यांवर चर्चा करून त्या निकाली काढण्याच्या हेतुने २३ जून रोजी बैठक ठरवून संघटनेला निमंत्रित केले. संघटनेच्या शिष्टमंडळात राज्य महासचिव प्रभाकर जीवने, जिल्हाध्यक्ष अंबादास तामगाडगे, दत्तात्र्यय कांबळे, राजेंद्र नखाते, प्रमोद ताजने, दीपक ढोले, प्रकाश तेलगोटे, प्रवीण बहादे, राजकुमार तेलंग, अविनाश पथाडे, वैशाली मनवर, प्रणाली सवाई आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मागासवर्गी कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवेदन
By admin | Updated: June 20, 2014 00:07 IST