आज जिल्हा कार्यकारिणीची बैठक : किसान सेलचे अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे येणार, आंदोलनाची दिशा ठरविणार यवतमाळ : संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाला असताना शासनाने केवळ पाच लाख रुपयांची मदत दिल्याच्या मुद्यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही या मुद्यावर चिंतन सुरू झाले आहे. या अनुषंगाने मंगळवारी २ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीची बैठक होत असून राष्ट्रवादीच्या किसान सेलचे राज्याध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे त्यात मार्गदर्शन करणार आहे. कालपर्यंत भाजपा-शिवसेना विरोधी बाकावर होती. परंतु आज हे पक्ष सत्तेत असल्याने विरोधकाची भूमिका बजावण्याची जबाबदारी काँग्रेस-राष्ट्रवादीवर आली आहे. काँग्रेसने मोर्चे-आंदोलनांद्वारे ही भूमिका काही प्रमाणात का होईना पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्या तुलनेत विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलनांच्या मुद्यावर माघारल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील २०५३ गावांमधील शेतकरी सध्या दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होऊनही या शेतकऱ्याच्या पदरी छदामही पडला नाही. वणी तालुक्यातील केवळ दोन गावांसाठी अवघी पाच लाखांची मदत मिळाली. या मुद्यावर रविवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक गाजली. या बैठकीबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले. काँग्रेसची आक्रमकता पाहून आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा विषय जिल्ह्यात हाती घेण्याची तयारी चालविली आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दारव्हा रोड स्थित निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी खास राष्ट्रवादी किसान आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे येत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत का भेटली नाही व ती मिळवून देण्यासाठी करावयाच्या आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत धोंडगे मार्गदर्शन करणार असल्याचे राष्ट्रवादीतून सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी) आगामी निवडणुकांचा विषयही अजेंड्यावर या बैठकीमध्ये आगामी निवडणुका हासुद्धा विषय प्रामुख्याने चर्चिला जाणार आहे. वर्षभराने जिल्हा परिषद, नगर परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आधी पदवीधर मतदारसंघ व त्यानंतर विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. यवतमाळ नगर परिषदेमध्ये लगतच्या आठ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला. या हद्दवाढीनंतर ग्रामपंचायतींना नगर परिषदेच्या निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व निवडणुका, पक्षबांधणी यावर चर्चा होईल. पक्षाच्या एकूणच कामकाजाचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. सत्तेमुळे भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांची कोंडी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याबाबत भाजपा-सेनेच्या ग्रामीण कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष आहे. मात्र सत्तेत असल्याने त्यांना उघडपणे बोलताही येत नाही आणि आंदोलनांची तर सोयच राहिलेली नाही. केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता, जिल्ह्यात शिवसेनेचे पालकमंत्री असूनही सामान्य कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, अशी निष्ठावंत शिवसैनिकांची भावना आहे. पाच आमदार असूनही कामे होत नसल्याची भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची ओरड आहे. या पेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये विरोधी पक्ष म्हणून शासकीय यंत्रणेत दहशत होती व भीतीने का होईना सहज कामे होत होती, असा युतीच्या कार्यकर्त्यांचा सूर आहे. सत्तेचा ‘लाभ’ भाजपा-सेनेतील केवळ पहिल्या-दुसऱ्या फळीच्या पदाधिकाऱ्यांनाच मिळतो आहे, आम्ही केवळ झेंडे पकडण्यापुरते अशी भावना कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवर आता राष्ट्रवादीतही चिंतन
By admin | Updated: February 2, 2016 02:09 IST