नोटाबंदीचा फटका : सरासरी ६० टक्के कर वसुली यवतमाळ : नोटाबंदी आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या महसूलात तब्बल दहा कोटींची घट झाली असून ६० कोटी ७६ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्य शासनाच्या तिजोरीत परिवहन विभागाच्या माध्यमातून मोठा आर्थिक भरणा जमा होतो. शासनाच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापैकी परिवहन खाते महत्वाचा स्त्रोत आहे. जिल्ह्यात लहान मोठ्या अशा साडेतीन लाखांवर वाहनांची नोंदणी आहे. त्यांच्याकडून विविध स्वरूपात कर गोळा केला जातो. ओव्हरलोड वाहने आणि वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून सर्वाधिक कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवणे अपेक्षित आहे. मात्र रिक्त जागांमुळे अशा वाहनधारकांचे फावत असून याचा फटका महसुली उत्पन्नावर होत आहे. परिवहन कार्यालयात वाहतूक निरीक्षकांच्या सहा जागा मंजूर असून प्रत्यक्ष तेच अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित जागा रिक्त आहेत. या प्रमाणे उपपरिवहन अधिकारी श्याम झोळ यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त जागेवर पुर्णवेळ अधिकारी देण्यात आला नाही. सहायक परिवहन अधिकारी विनोद देशमुख यांच्याकडे प्रभार आहे. त्यामुळे सध्या परिवहन कार्यालयात ‘आॅलईन वन’ म्हणून देशमुख काम करत आहेत. पोलीस आणि परिवहन विभागाच्या कार्यवाहीत ४७५ वाहनांचा वाहतूक परवाना रद्द करण्यात आला आहे. तर ४९३ वाहनांची नोंदणी निलंबित केली. यामध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सर्वाधिक समावेश आहे. काही वाहनातून अवैध वाहतूक केल्याचेही कारवाईत निष्पन्न झाले होते. अशाच वाहनाचे परवाने रद्द अथवा निलंबित करण्यात आले आहे. यात राज्याबाहेरची वाहने असल्यास तेथील परिवहन कार्यालयाकडे याचा अहवाल पाठविण्यात आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी) करदात्यांची संख्या घटली नोव्हेंबर अखेरपर्यंत ४० कोटी ५० लाखांचा महसूल वसूल झाला. २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत महसूल वसुली करताना अडचणी असल्याचे सांगण्यात येत आहे. नोटबंदीनंतर महसूल वसुलीचा ओघ वाढणे अपेक्षित होते, मात्र त्याचाही फायदा झाला नाही. उलट कर दात्यांची संख्या घटली आहे. नव्याने वाहन खरेदी होत असल्याने एकाच वेळी होणारा टॅक्स जमा होणे कमी झाले आहे.
‘आरटीओ’च्या महसुलात घट
By admin | Updated: January 11, 2017 00:28 IST