यवतमाळ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या आवारातील नेहरू स्टेडियममध्ये लाखो रुपये खर्ची घालून सोलर बॅटरी आणि लाईट बसविण्यात आले. नियम धाब्यावर बसवून याचे कंत्राट दिल्या गेले. एवढेच नाही आता तर चक्क चोरीस गेलेल्या सोलर बॅटरींची किमत मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांकडून केली आहे. त्यामुळे अल्प मानधनावर काम करणाऱ्या मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची दिवाळीच अंधारात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नाविण्यपूर्ण योजनेतून आणि जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून येथील गोदणी मार्गावरील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या आवारातील नेहरू स्टेडियममध्ये सौरपथदिवे बसविण्यात आले. एका केंद्रीय नेत्याच्या संस्थेला नियम धाब्यावर बसवून हे कंत्राट देण्यात आले. वास्तविक निविदा प्रक्रियेने दर मागवून कंत्राट देणे बंधनकारक असताना केवळ टक्केवारीसाठी तेथील अधिकाऱ्यांनी हा प्रकार केला. ‘लोकमत’ने हा गंभीर प्रकार उघडकीस आणल्यानंतर क्रीडा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. मात्र वरिष्ठांना वाटा दिल्याने हे प्रकरण निवळल्या गेले. त्यानंतर तरी असले घोटाळे होणार नाही अशी अपेक्षा होती. परंतु दिवसेंदिवस घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. सौर पथदिवे संचातील हजारो रुपये किमतीच्या १८ बॅटरी चोरीस गेल्या. चौकीदार असताना हा प्रकार घडला. मात्र शिक्षा मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना देण्यात आली. येथे वर्षानुवर्षापासून सात ते आठ कर्मचारी दोन ते पाच हजारापर्यंत अल्प मानधनावर काम करीत आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर त्यांच्या मानधनातून कुठलाही दोष नसताना ही रक्कम कपात करण्यात आली. अनेकांनी काळजावर दगड ठेवून आपल्या मुलाबाळांचे कपडे आणि गरजेच्या वस्तूसाठी ठेवलेले हे पैसे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला दिले. त्यांची कपात केलेली ही रक्कम परत मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नव्हेतर ही गंभीर आणि बेकायदेशीर बाब जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या कानापर्यंतही पोहोचली असल्याचे सांगण्यात आले. या गैरप्रकारावर आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
चोरी गेलेल्या सोलर बॅटऱ्यांची वसुली कर्मचाऱ्यांकडून
By admin | Updated: October 22, 2014 23:25 IST