मोजणी अशक्य : यवतमाळ, बाभूळगाव, राळेगाव, आर्णीत खरेदी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शासनाच्या नियोजन शून्यतेने तूर उत्पादकांचे हाल सुरूच आहे. जिल्ह्यातील चार तूर खरेदी केंद्र बंद पडले. या केंद्रांचा गुंता सोडविण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनला तब्बल आठ दिवस लागले असून बुधवारपासून खरेदी सुरू होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या किंमत समर्थन योजनेतून तूर खरेदी सुरू झाली. तसे परिपत्रक ९ मे रोजी निघाले. मात्र आठ दिवस लोटूनही चार केंद्रांवरील खरेदीचा गुंता कायम होता. या केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. केंद्रांवर स्फोटक स्थिती निर्माण झाली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी केवळ बैठकांवर बैठका सुरू होत्या. तथापि गुंता काही सुटत नव्हता. अखेर मंगळवारी हा गुंता सुटल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. आता उद्या बुधवारपासून जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या यवतमाळ, बाभूळगाव, राळेगाव आणि आर्णी या चार केंद्रांंवर तूर खरेदी सुरू होणार आहे. यवतमाळ येथे मार्केटिंग फेडरेशन खरेदी करणार आहे. मात्र त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही. त्यामुळे खरेदी सुरू होऊनही तूर मोजणी होईल की नाही, याबाबत साशंकता कायमच आहे. बाभूळगाव, आर्णी आणि राळेगाव येथील केंद्र खरेदी विक्री संघ चालविणार आहे. मात्र ३१ मे पर्यंतच खरेदी होणार असल्याने केवळ १५ दिवसांत सर्व तुरीची मोजणी होईल किंवा नाही, अशी धास्ती शेतकऱ्यांना सतावत आहे. बुधवारपासून चार खरेदी केंद्र सुरू होणार आहे. इतर ११ केंद्रांवर जुने मोजमाप संपल्यानंतर नवीन मोजमापाची प्रक्रिया सुरू होणार आहे. - पी. एस. किलोर प्रभारी मार्केटिंग फेडरेशन अधिकारी, यवतमाळ
तूर उत्पादकांचे हाल सुरूच
By admin | Updated: May 17, 2017 00:53 IST