यवतमाळ : निवडणूक आली की, इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांची संख्या कमी नसते. ऐनवेळी पक्ष निष्ठा बाजूला सारुन अनेकांनी विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केली. मात्र या निवडणुकीतून बंडखोर नगरसेवकांची पत उमेदवारासह प्रभागातील मतदारांच्याही लक्षात आली. दखल घेण्याइतकीही मते बंडखोर नगरसेवक उमेदवाराला मिळवून देऊ शकले नाही. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या रणधुमाळीत अनेक नगरसेवकांनी ऐनवेळेवर अगदी सोईची भूमिका घेतली. कोणतीही सार्वत्रिक निवडणूक येताच दलबदलविणाऱ्यांचा एक गटच नगरपरिषदेत तयार झाला आहे. या गटामध्ये भाजपा, काँग्रेस, बसपा या प्रमुख पक्षातील नगरसेवकांसह इतरांचाही समावेश आहे. कुणाला विजयी करण्याऐवजी केवळ राजकीय उट्टे काढण्यासाठीच हा दलबदल केल्याची माहिती आहे. आपले उपद्रवमूल्य दाखविण्याचा खटाटोप करणाऱ्या या नगरसेवकांचा किती प्रभाव आहे, हे मात्र या निवडणुकीने दिसून आले. यवतमाळ शहरात बहुतांश पक्षाकडे सशक्त असे संघटन नाही. नगरपरिषदेत सर्वाधिक सत्ता असलेल्या भाजपालाही गटबाजीने पोखरले आहे. ही गटबाजी थांबविण्यात स्थानिक नेत्यांना आतापर्यंत यश आले नाही. अशीच स्थिती काँग्रेस आणि बसपाची आहे. सातत्याने पक्ष विरोधी कारवायांसाठी उघड भूमिका घेणाऱ्या नगरसेवकांवर चाप लावण्यात पक्ष नेतृत्व अपयशी ठरल्याचे दिसत आहे. केवळ पक्षांतर्गत गटबाजीमुळे भाजपातील माजी नगराध्यक्षासह चार नगरसेवकांनी उघडपणे काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. काँग्रेसमध्ये असलेल्या माजी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी उघडउघड राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केला. बसपाच्या चार नगरसेवकांनी ऐनवेळी आपली भूमिका बदलवित शेवटच्या दोन दिवसात काँग्रेसकडे जाणे पसंत केले. परंतु मतदारांनी या नगरसेवकांना आपली पत दाखवून दिली. यवतमाळ शहर हे सध्या भाजपाचा बालेकिल्ला आहे. या निवडणुकीत शहरात मतदान घेताना भाजपाला आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागली. तरीही अपेक्षित मते मिळाली नाही. शहरात झालेल्या एकूण मतदानापैकी सर्वाधिक २० हजार ७६१ मते भाजपाला मिळाली. भाजपाचे १६ नगरसेवक आणि सातत्याने नगरपरिषदेत असलेली सत्ता या तुलनेत ही मते अतिशय कमी असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. ऐनवेळी दलबदलून जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्याचे या निवडणुकीवरून स्पष्ट झाले. पक्षनिष्ठा सोडून इतर पक्षाच्या उमेदवारासोबत उघडपणे फिरणाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर पक्षाच्या कारवाईनंतर नगरपरिषदेत नवीन समीकरण काय होणार यावरच सध्या शहरात चर्चा सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
निवडणुकीत दिसली बंडखोर नगरसेवकांची पत
By admin | Updated: October 25, 2014 01:47 IST