अकोलाबाजार : मांजर्डा येथील रेशन दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. यानंतरही सदर दुकानाला धान्य पुरवठा केला जात आहे. यवतमाळ तहसील प्रशासनाच्या या कारभाराविषयी नागरिकांनी रोष व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. यावर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सदर रेशन दुकानदार अन्न सुरक्षा यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ३०० रुपये घेतो, मजूरी करणाऱ्यांची नावे यादीत समाविष्ट करत नाही, धान्य आणि रेशनचा पुरवठा नियमित केला जात नाही. यासह परवानाधारक एस.एस. जाधव यांचा विवाह झाल्याने सदर दुकान त्यांचे नातेवाईक सांभाळतात, अशा आशयाची तक्रार प्रशासनाकडे झाली होती. या अनुषंगाने पुरवठा निरिक्षक वाय.ए. निवल यांनी या दुकानाची तपासणी केली. त्यावेळी माणिक खोडे, सरपंच विनोद टेकाम, उपसरपंच संजय राठोड, नरेंद्र शहारकर, सुनील मोहड, प्रवीण मडपाचे, गजानन खोडे, शिवदास सोनारकर, बबन पवार, किसन राठोड, भोपीदास चव्हाण, सुखदेव शेळके यांचे बयाण नोंदविले. शिवाय उपस्थित नागरिकांचे सामूहिक बयाण घेतले. यात सदर रास्त भाव दुकान चालविण्यात अनियमितता असल्याचे दिसून आले. यामुळे सदर रेशन दुकानाचा परवाना ४ आॅक्टोबर रोजी निलंबित करण्यात आल्याचे तक्रारकर्ते भोपीदास चव्हाण यांनी सांगितले. मात्र यानंतरही तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी या दुकानाला धान्य पुरवठा केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने तालुका पुरवठा अधिकारी डेकाटे यांच्याशी संपर्क केला असता, धान्य पुरवठा होईपर्यंत या दुकानाचा परवाना निलंबित झाल्याच्या आदेशाची प्रत वरिष्ठांकडून मिळाली नव्हती, असे सांगितले. लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी धान्य मिळावे या उद्देशाने या दुकानाला रेशन पुरवठा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
निलंबित दुकानाला रेशन मालाचा पुरवठा
By admin | Updated: October 18, 2014 02:03 IST