वणी : विदर्भात प्रसिध्द असलेल्या येथील रंगनाथ स्वामींच्या यात्रेला सुरूवात झाली आहे. पूर्वी ही यात्रा तब्बल ३७ दिवस राहात होती. मात्र आता हा कालवधी दिवसेंदिवस कमी होत आहे.गेल्या अनेक वर्षांपूर्वी येथे श्रीरंग शेषयायी विष्णूच्या मूर्तीची स्थापना करून मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिराच्या बांधकामाची रचना व शेषशायी विष्णूची प्राचीन मूर्ती कावेरी नदीच्या तिरावरील श्रीरंग क्षेत्राच्या देवालयाप्रमाणेच आहे, असे म्हटले जाते. मंदिर स्थापनेनंतर काही वर्षांनी या मदिरासमोरील मैदानावर यात्रेला सुरूवात झाली. त्याच मैदानाला ‘यात्रा मैदान’ म्हणून ओळखे जाते. काही काळानंतर ही यात्रा वणीजवळील जैनांचे तीर्थस्थान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भांदक येथील पार्श्वनाथ मंदिरासमोर स्थलांतरीत झाली होती. मात्र तत्कालीन जमीनदार गीरमा ढुमे आणि विठ्ठल देशपांडे यांनी भांदक येथे भरत असलेली ही यात्रा पुन्हा १९५९ पासून वणीत भरविण्यास सुरूवात केली, असे वृद्ध सांगतात. त्यावेळी महाशिवरात्रीपासून सतत ३७ दिवस यात्रा भरत होती. मात्र आता ही यात्रा मोजकेच दिवस सुरू राहाते. आता ही यात्रा ऐन भरात आहे. गुढीपाडव्यापासून यात्रेला बहर आला आहे. यात्रेत मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध आहेत. तयामुळे बच्चे कंपनीसाठी ही यात्रा सध्या महत्त्वाची ठरत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
रंगनाथ स्वामी यात्रा सुरू
By admin | Updated: March 29, 2015 00:07 IST