वृद्धाश्रमात गतप्राण : सोबत्यांच्या गोतावळ्यात सोडला जीवयवतमाळ : आयुष्यभर रस्त्यावर बेवारस जगलेल्या ७० वर्षांच्या ‘कवडू’ला क्रूर जगाने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही अपंग करून टाकले. हेटाळणी आणि कुत्सित नजरा सोसता-सोसता आयुष्याच्या शेवटी संत दोला महाराज वृद्धाश्रमात सोबत्यांचा गोतावळा मिळाला. पण हे सुखही औटघटकेचे ठरले. अवघ्या १५ दिवसांतच सोमवारी ‘कवडू’ला मृत्यूने कवेत घेतले.अर्धनग्न अवस्थेत पांढरकवडा शहरात हिंडणाऱ्या या वृद्धाला मध्यंतरी अपघात होऊन कंबर मोडली. तब्बल दोन महिने तो रस्त्यावरच विव्हळत होता. नातेवाईक फिरकले नाही अन् समाजही डोळे मिटून होता. अखेर दुर्गा मडावी या महिलेनेच ‘कवडू’ला उपचारासाठी यवतमाळात आणले. पण आधी मोफत उपचाराची हमी देणाऱ्या डॉक्टरने त्याची रवानगी जिल्हा शासकीय रुग्णालयात केली. तेथेही शस्त्रक्रियेपर्यंत उपचार पोहोचला नाही. ही करुण कहाणी ‘लोकमत’ने उजेडात आणताच वृद्धांची निस्वार्थ सेवा करणारे शेषराव डोंगरे सरसावले. त्यांनी कवडूला उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमात आश्रय दिला. तेथे शारीरिक दुखापतींवर उपचार शक्य नसले तरी कवडूला मानसिक आनंद मिळाला. तेथे त्याला ‘कवडू बाबा’ हे नामाभिधान प्राप्त झाले. इतर वृद्धांच्या गोतावळ्यात आणि शेषराव डोंगरे यांच्या सेवेच्या स्पर्शाने तो हरखून गेला. पण हे सुखाचे चारच दिवस कवडूला उपभोगता आले. प्रचंड आजारी असलेल्या कवडूची सोमवारी दुपारी प्राणज्योत मावळली.(स्थानिक प्रतिनिधी)शेवटचा दिवस गोड झालापांढरकवड्याच्या दुर्गा मडावी सरसावल्या नसत्या, तर कवडू पांढरकवड्याच्या रस्त्यावरच दगावला असता. उमरी पठारचे शेषराव डोंगरे सरसावले नसते, तर कदाचित तो यवतमाळच्या रूग्णालयात दगावला असता. पण नियतीने आयुष्यभर चटके दिल्यानंतर शेवटी कवडूला संत दोला महाराजांच्या नावाने चालणाऱ्या सेवाभावी वृद्धाश्रमाने आसरा दिला. त्यामुळे शेवटचे काही दिवस आणि शेवटचा प्रवास तरी ‘माणुसकी’ने झाला!
चार सुखाचे क्षण घेऊन ‘कवडू’चा राम राम!
By admin | Updated: April 12, 2017 00:04 IST