राळेगाव : तालुकास्तरावर सुरू झालेल्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कॅम्पलाही दलालांचा विळखा पडला असल्याचे चित्र दिसत आहे. १०-१५ दलालांनी चक्क टेबल-खुर्च्या लावून आपली दुकानदारी सुरू केली आहे.तीन-चार महिन्यांपूर्वी येथे तालुकास्तरावरील आरटीओचा कॅम्प सुरू झाला आहे. दुचाकी, चारचाकी आणि जड वाहन चालकांना लर्निंग, पक्के ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरटीओशी संबंधित इतर कामे येथे करणे सहज शक्य झाल्याने शहरवासीय आणि तालुक्यातील गरजूंना एक चांगली सुविधा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र जसजसे येथे आरटीओ कॅम्प नियमित येणे सुरू झाले. त्याप्रमाणे दलाल आणि एजंटांचा सुळसुळाटही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आरटीओद्वारे केवळ ८० रुपये शुल्क सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा करून काही कक्षात आपले सरकारी काम सुरू केले. पण त्यांच्यासोबत आणि आरटीओ मागे-मागे या एजंट-दलालांची गरज काय, असा प्रश्न जागरूक नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. सार्वजनिक विभागही आरटीओ वगळता इतर एजंट-दलालांना विश्रामगृह परिसरात व्यवसायास प्रतिबंध घालण्याची गरज आहे. पारदर्शक सेवा आरटीओने द्यावी, अशी मागणीही नागरिकांमधून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
राळेगावात आरटीओ कॅम्पलाही दलालांचा विळखा
By admin | Updated: December 19, 2015 02:32 IST