राळेगाव/घाटंजी : यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी खुनाच्या दोन घटना घडल्या. राळेगाव येथे लहान भावाने मोठ्याचा डोक्यात दगड घालून, तर मानोली (ता.घाटंजी) येथे इसमाला शेल्याने गळा आवळून ठार मारण्यात आले.राळेगाव येथील गोंडपुरा भागात रात्री २ वाजताच्या सुमारास गणेश लक्ष्मण घोडमारे याचा त्याचा लहान भाऊ मंगेश लक्ष्मण घोडमारे याने खून केला.गणेश रोजमजुरी करत होता. मात्र घरात खर्चासाठी कुठलीही रक्कम देत नव्हता. याच कारणावरून गणेश आणि मंगेश यांच्यात वाद होत होता. शनिवारी रात्री या दोघांमध्ये वाद झाला. याचे पर्यवसान मंगेशने गणेशच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्यात आले. या प्रकाराची तक्रार देवीबाई लक्ष्मण घोडमारे हिने केली. यावरून मंगेशविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार भरत कांबळे करत आहे.दुसरी घटना घाटंजी तालुक्याच्या मानोली येथे सायंकाळी ६ वाजता घडली. घाटंजी पालिकेतील चौकीदार नामदेव येलन्ना कुंटलवार (५२) याचा विजय अंबादास सिरगुडवार (३२) याने गळा आवळून खून केला. या दोघांमध्ये मानोली येथील बसस्थानकावर वाद झाला. या वादाचे पर्यवसान खुनात झाले. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सदर दोघांमधील वादाचे कारण कळू शकले नाही. मात्र या घटनेमुळे काही काळ गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. (लोकमत चमू)
राळेगावात भावाचा तर घाटंजीत चौकीदाराचा खून
By admin | Updated: October 11, 2015 00:37 IST