ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ ‘पोळ्याच्या हप्त्यात पाऊस आला नसता तर, आता एवढा मोठा खर्च झाला नसता. पाऊस येत नाही आणि कीड सुधरू देत नाही. तेव्हाच उलंगवाडी झाली असती तर आताच्या खर्चातून तरी वाचलो असतो.’ असे आता गावागावातील हतबल शेतकरी म्हणत आहे. करपणाऱ्या पिकांना पोळ््याच्या आठवड्यात झालेल्या पावसाने जिवदान दिले. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र त्यानंतर तब्बल महिना झाला तरी पावसाचा थेंब नाही. याकाळात शेतकऱ्यांनी मोठ्या आशाने कीड नियंत्रणासह खातावर मोठा खर्च केला. पोळ््यातल्या पावसाने आशा लावून नंतर मात्र दगा दिला. त्याचवेळी पाऊस आला नसता तर आताचा खर्च वाचला असता. या पावसानेच आम्हाला उद्ध्वस्त केले, असे आता शेतकरी म्हणत आहेत. निसर्गाच्या अवकृपेचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षांपासून बसत आहे. कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. गत वर्षी ओल्या दुष्काळाने उद्ध्वसस्त झालेल्या शेतकऱ्यांना यंदा कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पेरणीपासूनच पावसाने दडी मारली. दुबार-तिबार पेरणी केली. मात्र पावसाचा पत्ता नसल्याने शेतातील पीक करपू लागले. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. आता खारीफ हातचा गेला असे म्हणून शेतकऱ्यांनीही मन घट्ट केले होते. अनेकांनी तर शेतात जाणेही सोडून दिले होते. मात्र पोळ््याच्या आठवड्यात पावसाला प्रारंभ झाला. गणेशोत्सवाच्या काळात सारखा पाऊस कोसळला. शेतकऱ्यांची भाबडी आशा पुन्हा जागी झाली. आता खरीप वाचणार असे वाटू लागले. त्यामुळे शेतकरी नव्या जोमाने कामाला लागला. खतांच्या मात्रा देऊ लागला. चढ्या दराने खत खरेदी करू लागला. अशातच सोयाबीनवर मोझॅक आणि इतर किडींनी आक्रमण केले. तर कपाशीवर लाल्याचा प्रकोप वाढला. सुक्ष्म अन्नद्रव्यांसह कीड नियंत्रणासाठी महागडी औषधी फवारू लागला. मात्र कीड नियंत्रणात यायचे नावच नाही. तर पावसाचा थेंब नाही. उन्हाळ््यापेक्षाही कडक उन्ह तापत आहे. त्यामुळे सोयाबीन पूर्णत: उद्ध्वस्त झाला असून, शेतकऱ्यांनी तर काही भागात जनावरे शेतात सोडली. कपाशीही पाण्या अभावी सुकत आहे. पोळ््याच्या आठवड्यात पाऊस पडलाच नसता तर त्याचवेळी उलंगवाडी झाली असती. मात्र पावसाने आशा लागली. होते नव्हते पैसे शेतकऱ्यांनी पुन्हा पिकांवर लावले. परंतु पावसाचा पत्ता नाही आणि कीड नियंत्रणात यायचे नाव घेत नाही. पोळ््याच्या आठवड्यात पाऊस आलाच नसता तर एवढे उद्ध्वस्त झाले नसतो, हातातला पैसा गेला नसता, असे शेतकरी म्हणतात.
पावसानेच आशा लावून दिला दगा
By admin | Updated: October 5, 2014 23:13 IST