वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्ग : रूळाचे अलायमेंट बदलल्याने निधी वाटपात तांत्रिक अडचणयवतमाळ : जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला अद्यापही ग्रहण लागले आहे. त्या मार्गाच्या भूसंपादनासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त असतानाही त्याला वेळोवेळी इतर विभागाच्या कामात जुंपले जाते. त्यामुळे २००८-०९ पासूनची भूसंपादन प्रकरणे रेंगाळली आहेत. आता तर रेल्वे मार्गाचे अलायमेंट निश्चित नसल्याने जमिनीचे अवॉर्ड करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. एकूण २८४ किलोमिटर लांबीच्या या प्रस्तावित मार्गाचा सर्वाधिक म्हणजे १८० किलोमीटरचा भाग यवतमाळ जिल्ह्यात येतो. कळंब तालुक्यातून जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली यात १४० शेतकऱ्यांची ४५ हेक्टर जमिन लोहमार्गात जाणार आहे. लोहमार्गासाठी भूसंपादीत करण्यासाठी अनेक वर्षांपासून नियमित भूसंपादन अधिकारीच नव्हता. त्यामुळे २००८-०९ पासूनची प्रकरणे येथे प्रलंबित होती. उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या रुपाने पूर्णवेळ भूसंपादन अधिकारी मिळाला. मात्र दुर्देवाने येथेही पाठ सोडली नाही. भाकरे यांच्याकडे रोहयो त्यानंतर महसूल यांसारख्या व्यस्त विभागांचा प्रभार देण्यात आला. परिणामी भूसंपादनाची प्रक्रिया आणखी मंदावली. तरीही या काळात अकरा प्रकरणांचा नवीन भूसंपादन कायद्यानुसार निपटारा करण्यात आला. ही प्रकरणे अंतिम निवाड्यासाठी ठेवली असतानाच रेल्वे रुळाच्या अलायमेंटचा प्रश्न निर्माण झाला. यामध्ये प्रत्यक्ष ज्या शेतकऱ्यांची जमिन गेली त्यांच्याऐवजी इतर कोणाला लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली. हे टाळण्यासाठीच निकाली निघालेल्या अकरा प्रकरणांचे अवॉर्ड थांबविण्यात आले. आता रेल्वेच्या तांत्रिक विभागाकडून रेल्वे मार्गाचे अलायमेंट निश्चित झाल्यानंतरच कारवाई केली जाणार आहे व शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात येणार आहे. जिल्हावासीयांची या रेल्वे मार्गासंदर्भात मोठी अपेक्षा आहे. त्यासाठी तब्बल ५५० हेक्टर शेतजमिन भूसंपादित करावी लागणार आहे. या रेल्वे मार्गावर एकूण २८ स्टेशन प्रस्तावित आहेत. त्यामध्ये जिल्हयातील कळंब, तळेगाव, यवतमाळ, बोथबोडन, लाडखेड, तपोना, दारव्हा, अंतरगाव, हरसूल, वाई, दिग्रस, बेलवन, पुसद, हर्षी, शिळोणा, उमरखेड हे स्टेशन राहणार आहेत. या मार्गावर एकूण सहा बोगदे राहणार आहेत. या मार्गाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती देण्यासाठी प्रशासनाकडूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याशिवाय जिल्हावासियांचे रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार नाही. (कार्यालय प्रतिनिधी)
रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे अवॉर्ड थांबले
By admin | Updated: January 19, 2016 03:39 IST