तिघांविरुद्ध तक्रार : सहायक निबंधकांची कारवाई पुसद : कोणताही परवाना नसताना सावकारी करणाऱ्या एका दाम्पत्यासह तिघा जणांवर पुसद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निबंधकांनी केलेल्या या कारवाईने पुसदमध्ये एकच खळबळ उडाली आहे.बाळासाहेब सारंगधर बरडे (५५), सविता बाळासाहेब बरडे (५०) दोघे रा. खतीबवार्ड पुसद आणि अनिल गोकुलचंद पांडे (४५) रा. वसंतनगर पुसद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. येथील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक जी.एन. नाईक यांनी वसंतनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी अनिल पांडे यांच्याकडे सावकारीचा कोणताही परवाना नाही. त्यांनी १९ जानेवारी २०१५ पूर्वी ललिता जितेंद्र राठोड रा. हिवळणी (पा) ता. पुसद यांची फसवणूक केली. त्यावरून ललिता राठोड यांनी सहायक निबंधक जी.एन. नाईक यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यावरून सहायक निबंधकाच्या पथकाने पांडे यांच्या घरावर धाड टाकून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. चौकशीत अवैध सावकारी करीत असल्याचे आढळून आले. त्यावरून वसंतनगर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात बाळासाहेब बरडे व त्यांच्या पत्नी सविता बरडे यांनी ताहेर खान रहीम खान पठाण यांची फसवणूक केली. या प्रकरणी पठाण यांनी १९ नोव्हेंबर २०१३ रोजी तक्रार दिली होती. त्यावेळी सहायक निबंधकांच्या पथकाने बरडे यांच्या घरावर धाड मारली. त्यावेळी आक्षेपार्ह दस्तावेज जप्त करण्यात आले. त्यांच्याकडे सावकारीचा कोणताही परवाना आढळून आला नाही. अखेर बुधवारी आरोपी बाळासाहेब बरडे व सविता बरडे यांच्याविरुद्ध सहायक निबंधकातर्फे मनोरंजन राठोड यांनी पुसद शहर ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सहकारी अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हे नोंदविले आहे. एकाच वेळी तीन अवैध सावकाराविरुद्ध गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. (प्रतिनिधी)
पुसदच्या सावकार दाम्पत्यावर गुन्हा
By admin | Updated: October 20, 2016 01:35 IST