पुसद : नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये ‘कही खुशी-कही गम’ असा अनुभव अनेकांना आला. आरक्षण सोडतीमुळे दिग्गज नेते अडचणीत आले असून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. प्रभाग निश्चितीच्या बदलामुळे अनेकांना आतापासूनच जोडण्या कराव्या लागणार आहेत. विद्यमान नगरसेवकांपैकी अनेकांची सोय या आरक्षणामधून झाली आहे. तर काही जणांना फटकाही बसला आहे. प्रभाग निश्चितीच्या बदलामुळे अनेकांना अपेक्षितपणे योग्य प्रभाग मिळाला नाही. प्रभाग आरक्षणाच्या ठिकाणी प्रभाग स्पष्टपणे कळत नसल्याने प्रभागाच्या चतु:सीमांची माहिती घेण्यासाठी पालिकेच्या कार्यालयात इच्छुकांची गर्दी झाली होती. शनिवारी सकाळी ११ वाजता नगरपालिकेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी अजय कुरवाडे, शिवकांत पांडे, उत्तम डुकरे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला लोकसंख्येच्या आधारानुसार अनुसूचित जातीसाठीचे दोन, सात, बारा असे एकूण तीन प्रभाग निश्चित करण्यात आले. त्यानंतर त्यातील दोन महिला आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर तीन, आठ, चौदा असे चार प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात आले. त्यातील महिलांसाठीच्या तीन प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. उर्वरित सर्वसाधारण आणि महिलांसाठी निश्चित करण्यात आले. आरक्षणानंतर सभागृहाबाहेर प्रभाग रचना कशी आहे, हे समजून घेण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू होती. या सोडतीच्या वेळी आजी-माजी नगरसेवक व इच्छूक उपस्थित होते. एकूण २९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एक, अनुसूचित जातीसाठी दोन, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चार, सर्वसाधारण प्रवर्गासाठी सात, सर्वसाधारण (महिला) आठ, नागरिकांचा मागास प्रवर्गा (महिला) चार, अनुसूचित जाती (महिला) दोन अशा एकूण नव्या सभागृहात चौदा महिला नगरसेविकांचा तर पंधरा पुरुष नगरसेवकांचा समावेश होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
पुसद, उमरखेड, दिग्रसचे आरक्षण जाहीर
By admin | Updated: July 3, 2016 02:31 IST