पुसद : विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी सभापतीपदी राष्ट्रवादीचे सुभाष कांबळे व उपसभापती काँग्रेसचे अवधूत मस्के यांची अविरोध निवड झाली होती. मात्र मागील सात महिन्यांपासून सर्व काही सुरळीत असताना अचानकपणे मंगळवारी राष्ट्रवादीच्या सर्व १२ सदस्यांनी उपसभापती अवधूत मस्के यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली. आता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुसद पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार मनोहरराव नाईक यांचे वर्चस्व असून, एकूण १४ सदस्यांपैकी १२ सदस्य सध्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे आहेत. तर काँग्रेसचे केवळ दोन सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यस्तरावर काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता असल्याने आमदार मनोहरराव नाईक यांनी काँग्रेसचे अवधूत मस्के यांना उपसभापतीपद बहाल केले होते. मात्र विधानसभेत या दोन्ही पक्षांची युती न होता, हे पक्ष वेगवेगळे लढले. त्यामध्ये मस्के यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. पंचायत समितीचे उपसभापती अवधूत मस्के यांनी सन्मानजनक पद्धतीने राजीनामा द्यावा असा प्रस्ताव राष्ट्रवादीने त्यांच्यासमोर ठेवला होता. मात्र त्यांनी हा प्रस्ताव धुडकून लावल्याने सहा महिने वाट पाहून अखेरीस मस्के यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. या प्रस्तावावर एकूण १४ पैकी १२ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकारामुळे पुसद तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)काँग्रेस उमेदवाराचा प्रचार भोवला$$्रिअवधूत मस्के हे काँग्रेसचेच असल्याने त्यांनी विधानसभा निवडणुकीत अर्थातच काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. आणि हिच बाब राष्ट्रवादीच्या नेत्यांना खटकली. पुसद पंचायत समितीमध्ये तब्बल बारा सदस्य हे राष्ट्रवादीचे असून केवळ दोन सदस्य हे काँग्रेस पार्टीचे आहेत. पंचायत समितीचे सभापती सुभाष कांबळे हे राष्ट्रवादीचे असून उपसभापती अवधूत मस्के हे काँग्रेसचे आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सात महिने सर्वकाही सुरळीत चालल्यानंतर विधानसभेतील प्रचाराचा वचपा राष्ट्रवादीने काढण्याचे ठरविले आणि यातूनच अविश्वास ठराव आणण्यात आला.
पुसद पंचायत समिती उपसभापतींवर अविश्वास
By admin | Updated: April 2, 2015 00:04 IST